राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांनी आपला वैचारिका लढा भविष्यातदेखील सुरूच राहणार असल्याचे सांगितले. आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये मीरा कुमार यांना एनडीए आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली. त्यानंतर मीरा कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती झाल्याबद्दल अभिनंदन केले. मात्र, या पराभवानंतर खचून न जाता आपला लढा सुरूच राहणार असल्याचे मीरा कुमार यांनी सांगितले. मी स्पष्ट करू इच्छिते की, आजच्या पराभवामुळे माझी विचारांसाठीची लढाई संपणार नाही, ती कायम सुरूच राहील. यावेळी मीरा कुमार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकमताने उमेदवारी दिल्याबद्दल , निवडणुकीत पाठिंबा आणि मतदान केल्याबद्दल घटकपक्षांचे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले. तसेच भविष्यात निधर्मीवाद, दडपशाही आणि उपेक्षितांच्या हक्कांसाठीचा आपला लढा सुरूच राहील, असे मीरा कुमार यांनी म्हटले.

रामनाथ कोविंद: वकील ते राष्ट्रपती; किराणा दुकानदाराच्या मुलाचा थक्क करणारा प्रवास

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत झाली. निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. कोविंद यांना २०८ मते मिळाल्याचे सांगण्यात येतं. तर दोन मते अवैध ठरली आहेत. मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली. विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास कोविंद यांना भाजप १२२, शिवसेना ६३ आणि त्यात अपक्ष १३ अशी एकूण १९८ मते मिळणे अपेक्षित होते. पण कोविंद यांना एकूण २०८ मते मिळाली आहेत. तर मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली आहेत. मतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास कोविंद यांना १० मते अधिक मिळाली आहेत. आता ही १० मते नक्की कोणती? ती मते काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेसची? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव