संसदेला माझ्या आयुष्यात मंदिराचे स्थान आहे आणि लोकसेवा ही माझी आवड आहे, या शब्दांमध्ये मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती म्हणून केलेल्या त्यांच्या अखेरच्या भाषणात अनेक गोष्टींवर भाष्य केले. ‘वादविवाद, चर्चा आणि मतभेद’ ही भारतीय लोकशाहीची आणि विशेषत: संसदेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, असेदेखील यावेळी मुखर्जी यांनी म्हटले. ‘संसदेनेच मला घडवले,’ असे म्हणत मुखर्जी यांनी संसदेचे आभार मानले.

प्रणव मुखर्जी यांनी देशाचे १३ वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. त्यांनी प्रतिभा पाटील यांच्याकडून राष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेतली होती. ‘देशाच्या लोकांनी आणि लोकप्रतिनिधींनी मला देशातील सर्वोच्च सन्मान दिला. याबद्दल सर्वांचे आभार मी शब्दातदेखील व्यक्त करु शकत नाही. मात्र देशाचा नागरिक असणे, हादेखील एक सर्वोच्च सन्मान आहे, हे मला माहित आहे,’ असे प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या शेवटच्या संदेशात बोलताना म्हटले.

‘उद्यापासून मी तुमच्याशी एक सर्वसामान्य भारतीय म्हणून संवाद साधेन आणि या देशाचा सामान्य नागरिक असणेदेखील एक सन्मान आहे,’ अशा शब्दांमध्ये प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘देशातून गरिबी हद्दपार झाल्यास तो आनंदाचा क्षण असेल. सर्वसमावेशकतेमुळे विकास सर्वांपर्यंत पोहोचेल. आर्थिक विकास सर्वसमावेशक असणे अत्यंत आवश्यक आहे. गरिबातील गरिबांचे सशक्तीकरण गरजेचे असून सरकारच्या योजनेचा लाभ तळागाळातील लोकांपर्यत पोहोचायला हवा,’ असेदेखील प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या अखेरच्या संदेशादरम्यान म्हटले.

‘शिक्षण यंत्रणेचे सक्षमीकरण अतिशय गरजेचे आहे. शिक्षण आपल्याला सोनेरी दिवस दाखवू शकते. सध्या देशात हिंसेचे वातावरण आहे. लोकांच्या कृतीतून, शब्दांमधून हिंसा व्हायला नको, अशी परिस्थिती आपण निर्माण करायला हवी. देशाचा खराखुरा विकास साधायचा असेल, तर प्रत्येकाला विकासाच्या प्रक्रियेशी जोडून घ्यायला हवे. या प्रक्रियेचा भाग आहोत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला हवी,’ असेदेखील मुखर्जी यांनी त्यांच्या शेवटच्या संदेशात म्हटले.