देशात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या काही रोहिंग्या मुस्लिमांकडून देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे केंद्र सरकारने म्हटले असतानाच, या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेला म्यानमारच्या स्टेट काऊंसिलर आँग सान स्यू की यांनी उत्तर दिले आहे. रोहिंग्या मुस्लिमांनी देशविरोधी कारवाया केल्या आहेत. म्यानमारमध्येही त्यांनी हल्ले केले आहेत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये आश्रय दिला, पण त्याचा परिणाम काय झाला, असा सवाल करत आम्ही टीकेला घाबरणारे नाहीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

मानवधिकार उल्लंघनाचा आम्ही निषेध करतो. रोहिंग्या मुस्लिमांनी देशविरोधी कारवाया केल्याचे त्या म्हणाल्या. आमची सुरक्षा दले कोणत्याही परिस्थितीचा तसेच दहशतवादासारख्या संकटाचा सामना करण्यास सक्षम आहेत, असेही त्या म्हणाल्या. रोहिंग्यांनी म्यानमारमध्ये हल्ले केले आहेत. जे लोक येथून पलायन करत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातील सामाजिक परिस्थिती खूपच बिकट आहे. या परिस्थितीचा सामना करत आहोत. सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘काही’ रोहिंग्यांचा आयसिसशी संबंध; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होत असलेल्या टीकेला आम्ही घाबरत नाही. आमचे सरकार केवळ १८ महिन्यांपासून सत्तेत आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहोत. मानवाधिकार उल्लंघनाचा आम्ही निषेध करतो. दहशतवादी कारवायांविरोधात कठोर पावले उचलण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. देशात शांतता नांदावी यासाठी केंद्रीय समितीची स्थापना केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, रोहिंग्या निर्वासितांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती कालच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली होती. रोहिंग्या निर्वासितांचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आणि आयसिससारख्या क्रूर दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचेही सरकारने म्हटले होते. रोहिंग्यांना भारतात वास्तव्य करण्याची परवानगी देऊ नये, असेही सरकारने सांगितले होते.