बांगलादेशात असलेल्या ४,२०,००० हजार रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारने परत नेलेच पाहिजे, असे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे. म्यानमारमध्ये हिंसाचार वाढल्यानंतर रोहिंग्या मुसलमान मोठ्या संख्येने पलायन करत आहेत. हसीना या सध्या न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी झाल्या आहेत. याप्रकरणी म्यानमारवर आणखी आंतरराष्ट्रीय दबावाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

आम्ही म्यानमारला स्पष्टपणे सांगितलं आहे की, ते तुमचे नागरिक आहेत. त्यांना परत घेऊन जावेच लागेल. तुम्हाला (म्यानमार) त्यांना सुरक्षा आणि आसरा दिलाच पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, असे त्यांनी न्यूयॉर्क येथे झालेल्या बैठकीत म्हटले.

बांगलादेशातील रोहिंग्यांना म्यानमारने परत घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु, म्यानमारने अद्याप आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेले नाही. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग स्यान स्कू की यांनी आंतरराष्ट्रीय दबावाचा आमच्यावर काहीच फरक पडणार नसल्याचे म्हटले होते.

दरम्यान, रोहिंग्या मुसलमानांची समस्या बांगलादेशाबरोबर भारतालाही भेडसावत आहे. सुमारे ४०,००० रोहिंग्या सध्या भारतात राहत आहेत. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रोहिंग्या मुसलमान भारतात अवैधरित्या घुसल्याचे म्हटले होते. देशाच्या सुरक्षेला हा धोका असल्याचे सरकारने म्हटले होते. त्याचबरोबर काही रोहिंग्यांचे आयसीस या दहशतवादी संघटना व पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयबरोबर संबंध असल्याचे म्हटले आहे.