पंतप्रधान मोदींकडून सहकार्याचे वचन

भारत व म्यानमार यांच्यात अनेक शतकांचे सांस्कृतिक संबंध घट्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. मोदी व म्यानमारच्या नेत्या ऑंग सान सू की यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सू की भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या होत्या.

सू की यांचे हे दुसरे घर आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. तसेच मदतीसाठी भारत म्यानमारच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

दोन देशांदरम्यान सुरक्षाविषयक समन्वय अधिक गरजेचा असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. म्यानमारमधील भूकंपात पॅगोडाचे नुकसान झाले होते. त्यावेळी भारताने पुन्हा बांधणीसाठी मदत केल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारतातील लोकशाहीचे म्यानमारला कौतुक असल्याचे सू की यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांशी चर्चेत विकासाच्या मुद्दय़ाबरोबर इतरही विविध विषयांवर चर्चा केल्याचे सू की यांनी सांगितले. अनेक वर्षांच्या अस्थिरतेचे परिणाम आमच्या देशाला भोगावे लागले. त्यामुळे आता आम्हाला शांतता व स्थैर्य हवे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. भारताने सहकार्याचा हात पुढे केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान व राष्ट्रपतींचे आभार मानले.