उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे की नाही यावर आता विश्वास ठेवणे अधिकच कठीण बनले आहे. कारण अटक करण्यात आलेल्या एका कुप्रसिद्ध गुंडाला १ कोटी रुपयांच्या लाचेच्या बदल्यात सोडून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ही बाब उघड होताच मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या प्रकरणी एका पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या (IG) अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पंजाबमधील नाभा जेलमध्ये दंगल घडवून दहशतवाद्याला पळून जाण्यात मदत करणारी योजना आखणाऱा मास्टरमाईंड गुरप्रीत सिंह ऊर्फ गोपी घनश्याम पुरा याला अटकेनंतर १ कोटी रुपयांच्या लाचेच्या बदल्यात सोडून दिल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्यावर आहे.

फिल्मी स्टाईलने २७ नोव्हेंबर २०१६ मध्ये पटियाला येथील नाभा तुरुंगातील खलिस्तान लिब्रेशन फ्रंट आणि बब्बर खालसाच्या दहशतवाद्यांना पोलिसांच्या वेशात जाऊन पळवून नेले होते. या कारस्थानाचा मास्टर माईंड गोपी घनश्याम पुरा याला उत्तर प्रदेशमध्ये १० सप्टेंबर रोजी पकडण्यात आले होते. घनश्याम पुराच्या एका मित्राने त्याचा एन्काऊंटर होण्याच्या भितीने पुराच्या अटकेची बातमी आपल्या फेसबुकवरुन जाहीर केली होती. दरम्यान, पंजाबमधील एका मोठ्या गुन्हेगाराच्या आणि मद्य व्यापाऱ्याच्या माध्यमांतून १ कोटी रुपयांचा सौदा झाला होता. यामध्ये सुलतानपूरच्या एका काँग्रेस नेत्याने मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी पंजाब पोलिसांनी मद्य व्यापारी रिंपल आणि अमनदीप यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग केले होते. त्यानुसार या प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. यामध्ये पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून पुराला सोडवण्याची योजना होती. पंजाब पोलीस आणि आयबीने याची माहिती यूपी सरकारला दिली. यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारने चौकशीचे आदेश दिले. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पदावरून हटवण्यात आले आहे.