दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीवर तयार करण्यात आलेल्या वृत्तपटाच्या प्रसारणावरून वादंग निर्माण झालेले असतानाच नागालॅण्डमधील दिमापूर येथे एका बलात्काऱ्याला भरचौकात बेदम मारहाण करून फाशी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सय्यद फरीद खान (३५) असे या नराधमाचे नाव असून त्याला जमावाने तुरुंगातून खेचून आणत बेदम मारहाण केली. त्यात तो ठार झाला. त्यानंतर सय्यदचा मृतदेह भरचौकात फासावर लटकवण्यात आला.
सय्यद फरीद खान हा मूळचा बांगलादेशी असून तो आसाममार्गे नागालॅण्डमध्ये आला होता. वापरलेल्या गाडय़ांच्या विक्रीचा तो व्यवसाय करीत होता. सय्यदने २३ फेब्रुवारी रोजी नागा समुदायाच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, नागा समुदायातील लोकांमध्ये या घटनेवरून असंतोष खदखदत होता. गुरुवारी सायंकाळी ६०० जणांचा जमाव कारागृहावर चालून गेला आणि जमावाने सय्यदला खेचतच कारागृहाबाहेर आणले. त्यानंतर त्याची शहरभर फरफटत धिंड काढण्यात आली आणि वाटेतच त्याला बेदम मारहाण केली जात होती. या मारहाणीत सय्यद मरण पावला आणि त्यानंतर जमावाने त्याला भररस्त्यात फासावर लटकविले. मोठय़ा प्रमाणावर जमाव कारागृहावर चालून आल्याने तेथील सुरक्षाव्यवस्था अपुरी पडल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे आसामातही सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
केंद्राकडून गंभीर दखल
दिमापूरमधील घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने या संपूर्ण घटनेचा अहवाल राज्य सरकारकडे मागितला आहे. हिंसाचाराचा आगडोंब उसळू नये यासाठी आसामातही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. एवढा मोठा जमाव कारागृहात कसा शिरला, याबाबत आम्ही राज्य सरकारकडून अहवाल मागविला असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांना आवश्यक त्या उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या आहेत.