दहशतवाद्यांनी हल्ला चढवलेल्या आणि ओलीससदृश स्थिती निर्माण झालेल्या नगरोटा येथील लष्करी तळावरील दोन संकुले लष्कराने मोकळी केली असून, दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरलेल्या या तळावरील तपासणी मोहीम गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली.

लष्करी तळाचा संपूर्ण परिसर मोकळा करण्यासाठी तपासणी व स्वच्छता मोहीम आजही सुरू असून त्यासाठी आणखी काही वेळ लागेल. अद्याप कुणालाही आत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असे लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लष्कराच्या ११६ तोफखाना युनिटमध्ये ज्या ठिकाणी गोळीबार आणि ओलीससदृश परिस्थिती घडली होती, त्या दोन मुख्य इमारती मोकळ्या करण्यात आल्या असून, तेथे आता न फुटलेले बॉम्ब शिल्लक नाहीत. या संपूर्ण भागाचा इंचन्इंच मोकळा केला जात असल्याने तो सामान्य व्यवहारासाठी खुला करण्यास वेळ लागेल, असे हा अधिकारी म्हणाला.

न फुटलेले वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब या दोन संकुलांभोवती मोठय़ा संख्येत आढळले असून, त्यापैकी बरेच गुरुवारी नष्ट करण्यात आले. या ठिकाणी आणखी कुणी दहशतवादी आहे काय, हे शोधण्यासाठी ही मोहीम सुरू असून आम्ही कुठलीही जोखीम पत्करू शकत नाही, असेही त्याने सांगितले.