सर्व भारतीय हे हिंदू आहेत असे वक्तव्य करून अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी गेले काही दिवस हिंदू कुणाला म्हणावे यावरून सुरू असलेल्या वादात आणखी तेल ओतले आहे. असे असले तरी नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, मी सर्व भारतीय हे हिंदू आहेत असे म्हणाले. अरबी भाषेत भारतात राहणाऱ्या लोकांना हिंदी म्हणतात, मी जे म्हणाले ते धर्माच्या संदर्भात नव्हते तर राष्ट्रीयत्वाच्या बाबत होते. आपण भारतात राहणारे सर्व लोक हिंदू आहेत असे मी  म्हणाले नाही, असा दावाही त्यांनी केला. पीटीआयशी बोलताना त्या म्हणाल्या की, जगात असा कुठलाही देश नसेल ज्याला तीन भाषात तीन वेगळी नावे आहेत त्यामुळे सर्व भारतीयांची जी ओळख आहे त्यात एकसमानता असायला हवी. अरबी भाषेत भारतीयांना हिंदी व हिंदुस्तानी म्हणतात. पर्शियन व इंग्रजी भाषेत भारतीय म्हणतात. आपण हिंदी आहोत, हिंदूस्तानी आहोत तीच आपली ओळख आहे. हिंदी भारतीय व हिंदुस्थानी हे एकच आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी सांगितले की, जर हिंदुस्थानातील व्यक्तीला परदेशात हिंदू संबोधले गेले किंवा येथील मुस्लिमांना तेथे हिंदू मुस्लिम किंवा ख्रिश्चनांना हिंदू ख्रिश्चन संबोधले गेले तर त्यात काही अतिशयोक्ती आहे असे आपल्याला वाटत नाही.
रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय हे हिंदू आहेत असे जे वक्तव्य केले आहे त्यावर प्रतिक्रिया देण्यास नजमा हेपतुल्ला यांनी नकार दिला. त्यांनी इक्बाल यांच्या कवितेचा दाखला देत सांगितले की, हिंदी हैं हम वतन हैं हिंदोस्ताँ हमारा.
भारतीयांना हिंदूं म्हणण्यात गैर काहीच नाही असे हेपतुल्ला यांनी सांगितल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. काँग्रेसने त्यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. पक्षाचे नेते मनीष तिवारी यांनी सांगितले की, नजमा हेपतुल्ला यांनी राज्यघटना वाचावी. जर राज्यघटना वाचली तर नजमाजींविषयी आपल्याला आदर आहे. राज्यघटनेत भारत असा उल्लेख आहे. त्यामुळे भारतात राहणारे लोक भारतीय आहेत हिंदू नाहीत.

मी सर्व भारतीय हे हिंदू आहेत असे म्हणाले. अरबी भाषेत भारतात राहणाऱ्या लोकांना हिंदी म्हणतात, मी जे म्हणाले ते धर्माच्या संदर्भात नव्हते तर राष्ट्रीयत्वाच्या बाबत होते. आपण भारतात राहणारे सर्व लोक हिंदू आहेत असे मी  म्हणाले नाही,
नजमा हेपतुल्ला