मद्यसम्राट पॉण्टी चढ्ढा याच्यावर त्याचाच भाऊ हरदीप याने केलेल्या गोळीबार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उत्तराखंड अल्पसंख्य आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेला सुखदेवसिंग नामधारी हाच असल्याचा आरोप शनिवारी पोलिसांनी केल्याने खळबळ माजली आहे.
हरदीप याने आपल्यावर बंदूक रोखल्याने आपण दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर येथील फार्म हाऊसवर गोळी मारली, अशी कबुली नामधारी याने दिल्याचे पोलिसांनी महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे स्पष्ट केले.
याबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगर दंडाधिकारी संदीप गर्ग यांनी नामधारी याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्ह्य़ासाठी वापरलेले शस्त्र शोधण्यासाठी चौकशी यंत्रणेला संधी दिली पाहिजे, असे कारण गर्ग यांनी दिले आणि नामधारी याची पोलीस कोठडीत रवानगी केली.
गुन्ह्य़ानंतर सदर फार्महाऊसची मोडतोड करणे यासह नामधारीवर पोलिसांनी लूट, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न करणे आदी आरोपही ठेवले आहेत. या गोळीबार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नामधारीच असून त्याने यापूर्वी दिलेल्या जबानीत गोळीबार केल्याचे कबूल केले नाही. इतकेच नव्हे तर त्याने बंदूकही दडवून ठेवली, असे पोलिसांनी सांगितले.
न्यायालयातून बाहेर पडताना नामधारी याने मीडियाच्या प्रतिनिधींना सांगितले की, हरदीपवर आपण गोळीबार केला नाही. या प्रकरणी आपल्याला जास्त बोलावयाचे नाही. तो केवळ अपघात होता आणि पोलिसांना आपणच पाचारण केले, असेही नामधारी याने सांगितले.