समाजवादी पक्षाच्या (सपा) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ५५ सदस्यांची यादी आज जाहीर करण्यात आली. मात्र, पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यकारिणीतून त्यांचे वडील मुलायमसिंह यादव आणि चुलते शिवपाल यादव यांची नावे यातून वगळण्यात आली आहेत.
या यादीमध्ये समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची पुन्हा वर्णी लागणार का? याबाबत रहस्य कायम होते. मात्र, आता ते नव्या कार्यकारिणीत नसणार हे स्पष्ट झाले आहे.


कौटुंबिक वाद निर्माण झाल्यानंतर उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकांपूर्वी अखिलेश यादव यांनी कायदेशीर लढा देत समाजवादी पक्षाचे अध्यक्षपद मुलायमसिंह यांच्याकडून आपल्याकडे घेण्यात यश मिळवले होते.

सपाचे मुख्य सरचिटणीस राम गोपाल यादव यांनी जाहीर केलेल्या या नव्या कार्यकारिणीच्या यादीत किरोन्मय नंदा यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आझम खान, नरेश अगरवाल आणि इंद्रजित सरोज यांच्यासह १० सरचिटणीस, १० सचिव, जया बच्चन आणि सहा विशेष निमंत्रितांसह २५ सदस्य असणार आहेत. पक्षाने राज्यसभा सदस्य खासदार संजय सेठ यांच्याकडे खजिनदार पद सोपवले आहे. सेठ हे व्यावसायाने बांधकाम व्यावसायिक असून ते मुलायमसिंह यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात.