‘आ नमो बहू नाडे छे’ या नाटकाचे नाव बदलावे, कारण त्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ज्या ‘नमो’ या नावाने ओळखले जातात तो शब्द वापरला आहे, असा आदेश राज्याच्या सांस्कृतिक खात्याने दिला असल्याचा दावा या नाटकाच्या निर्मात्यांनी केला आहे.
नाटकाचे निर्माते संजय गोरडिया यांनी असा आरोप केला, की आम्हाला गुजरातमध्ये या नाटकाचे मूळ नाव सक्तीने बदलावयास लावले. गुजरात सरकारच्या सर्टिफिकेशन अधिकाऱ्यांनी या नावाला आक्षेप घेतला होता.
 हे नाटक म्हणजे राजकीय टीका आहे. नंतर आम्ही ते नाव बदलून ‘आ नमो नडता नथी’ असे केले, यात नमोमुळे काही समस्या निर्माण होत नाही. आम्ही फक्त गुजरातपुरते हे नाव बदलले आहे. ते म्हणाले, की देशात इतरत्र हे नाटक मूळ नावाने म्हणजे ‘आ नमो बहू नाडे छे’ या नावाने दाखवले जाणार आहे.
गुजरातमध्ये जरी या नाटकाचे नाव बदलले असले तरी त्याच्या संहितेत कुठलाही बदल केलेला नाही, त्यामुळे आम्ही बदलण्यास होकार दिला असे त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक विभाग वगळता वडोदरा नगरपालिकेनेही या नाटकाच्या नावाला आक्षेप घेतला होता. हे नाटक १७ ते २१ जून दरम्यान तेथे दाखवले जाणार होते. वडोदरा येथील स्थानिक आयोजकांनी या नाटकाचे मूळ नाव वृत्तपत्रातील जाहिरातीत छापल्यानंतर खरा वाद सुरू झाला.  हे नाटक विपुल मेहता यांनी दिग्दर्शित केले असून, त्यात गोरडिया यांनी भूमिका केली आहे. खमण मोरबीवाला, त्याचे दिवंगत वडील नमो ऊर्फ नरोत्तम मोरबीवाला, मुलगा उमंग यांच्याभोवती ही कथा गुंफलेली आहे.