देशात डिजिटल युगाचा मार्ग सुकर करणारे आणि आधार प्रकल्पाचे कर्ताधर्ता राहिलेल्या नंदन नीलकेणी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कौतूक केले आहे. देशातील इतर भागासारखा उत्तर प्रदेशचाही विकास व्हावा असे येथील जनादेशावरून दिसून येते. या निकालाचा सारांश एकच आहे, तो म्हणजे आता सर्वांना विकास हवा आहे, असे गौरवौद्गार त्यांनी काढले. इंग्रजी वाहिनी इटी नाऊबरोबर बोलताना त्यांनी या निकालाबाबत आपले मत व्यक्त केले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांचेही कौतूक केले.

आता लोकांना चांगली राहणीमान आणि प्राथमिक गरजा पूर्ण करणारे सरकार हवे आहे. जेथे त्यांना या शक्यता दिसून येतात. त्यांना मतदान करण्यास ते बिल्कूल कचरत नाहीत, असेही ते म्हणाले. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचे कौतूक करताना त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आणि देशातील संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या रचनेत अशा एका धक्क्याची गरज होती आणि ती या सरकारने पूर्ण केली. यामुळे डिजिटलायझेशनलाही प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले.
डिजिटलायझेशनच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधील गुंतवणूकीचा फायदा आता मिळण्यास सुरूवात झाली आहे. डिजिटलायझेशननंतर भारतातील आर्थिक आकड्यांमधील कमतरता दूर होईल. यामुळे सरकारच्या लोकप्रिय योजनांना मदतही मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले आहे. या पक्षाने ४०३ जागांपैकी तब्बल ३१२ जागांवर विजय मिळवला. सहयोगी पक्षांसह हा आकडा ३२५ इतका होता. भाजपने हा पंतप्रधान मोदींच्या काम आणि विकास नीतीचा हा विजय असल्याचे म्हटले आहे.