गेली १९ वर्षे गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आगामी निवडणुकामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा विजय व्हावा यासाठी आतापासूनच तयारीला लागा अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या नेत्यांना दिल्या आहेत. नुकताच झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी २०१९ च्या निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू करा असे सांगितले होते. शुक्रवारी भाजप नेत्यांशी झालेल्या बैठकीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांबाबतची आपली दिशा ठरवण्याचे आवाहन केले. निवडणुकांमध्ये यश हवे असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहचवा असे ते म्हणाले.

दमन – दीव, गुजरात आणि राजस्थानच्या खासदारांची भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मोदींनी भेट घेतली. मतदात्यांशी संपर्क वाढवण्याचे आवाहन मोदींनी त्यांना केले आहे. केंद्र सरकारच्या योजना जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याच्या कामातूनच लोकांशी संपर्क वाढेल असे ते म्हणाले. प्रत्येक खासदाराने पाच विधानसभा मतदार संघांची निवड करावी आणि त्याठिकाणी आपल्या कामे करावीत. असे मोदींनी म्हटले. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी आणि त्यानंतर सलग ७२ तास खेड्यामध्ये जावे असे त्यांनी सांगितले. या तीन दिवसांच्या काळात खासदारांनी आपल्या योजना लोकापर्यंत पोहचल्या की नाहीत हे तपासून पाहावे असे मोदींनी म्हटले.

त्याबरोबरच लोकांना काय हवे काय नको याचीही विचारपूस करावी असे ते म्हणाले. ६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिन आहे. तो दिवसही मतदात्यांसोबत साजरा करावा असे मोदी यांनी सांगितले. या बैठकीमध्ये मोदींनी प्रत्येक खासदाराला आपल्या मतदार संघात केलेली दोन मोठी कामे कोणती याबाबत लेखी उत्तर मागितले आहे. या कामांमधील काही निवडक उदाहरणे भारतीय जनता पक्षाचा प्रचार पुस्तकामध्ये देण्यात येतील असे ते म्हणाले. आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ घालवावा असे ते म्हणाले. मुद्रा योजना जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा असे ते म्हणाले. मुद्रा योजनेअंतर्गत गरजूंना व्यवसायासाठी सुरक्षित कर्जाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढवावा असे ते म्हणाले.