पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) जर्मनीत झालेल्या भारत-जर्मनी शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी त्यांच्यासोबत जर्मनीच्या चॅन्सेलर अॅंजेला मर्केल याही उपस्थित होत्या. जर्मनी येथे आयोजित कऱण्यात आलेली ही चौथी परिषद होती. मोदी नुकतेच युरोपच्या दौऱ्यावर गेले असून, आज त्यांनी बर्लिन येथील परिषदेला उपस्थिती लावली.

जर्मनीच्या चान्सलर कार्यालयातर्फे मोदींचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी मर्केल आणि जर्मनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जर्मन सैन्याने भारताच्या राष्ट्रगीताचे अतिशय उत्तम सादरीकरण केले.

उभय देशांमध्ये प्रत्येक दोन वर्षांनी होणाऱ्या या परिषदेत मोदी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांसोबत उपस्थित होते. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन, व्यापार मंत्री निर्मला सितारामन, ऊर्जामंत्री पियुष गोयल आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचा समावेश होता. याआधीची परिषद २०१५ मध्ये दिल्लीमध्ये पार पडली होती.

२०१७ च्या परिषदेमध्ये दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक, सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवाया, विज्ञान तंत्रज्ञान, गुणात्मक विकास, शहरी पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य आणि पर्यायी औषधे, ऊर्जा यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर म्हटले होते.

युरोपीय देशांमधील जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. याशिवाय परदेशी थेट गुंतवणुकीच्या बाबतीतही जर्मनीचा भारतामध्ये मोठा वाटा आहे. भारतात सध्या १६०० जर्मन कंपन्या असून, ६०० संयुक्तरित्या कार्यरत कंपन्या आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.