भाजप सरकारला सत्तेवर येऊन लवकरच दोन वर्षे पूर्ण होणार असल्याने या कालावधीत सरकारने केलेली कामे पक्षाच्या खासदारांनी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मुद्रा योजना, एलपीजी पुरवठा आणि गावांचे विद्युतीकरण ही मोठी कामे केली असल्याचा दावा सरकारने केला आहे.
संसदीय पक्षाच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्र अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीआधी जनतेला जी आश्वासने देण्यात आली होती ती पूर्ण केली जात आहेत. तसेच आणखी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असे या वेळी मोदी म्हणाले. संसदीय पक्षाच्या बैठकीत हेलिकॉप्टर खरेदीचा मुद्दाही मांडण्यात आला, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितले.
मुद्रा योजना, १८ हजार गावांचे सुरू असलेले विद्युतीकरण, तीन कोटींहून अधिक कुटुंबांना एलपीजी सेवेचा लाभ आणि एलईडी दिव्यांचे वाटप या सरकारच्या मोठय़ा उपलब्धी असल्याचे मोदी यांनी म्हटले, असे रुडी म्हणाले. भाजपकडून इतरही विकास योजना देशभर राबविण्यात येत असून जनतेला देण्यात आलेला शब्द पाळला जाईल असेही रुडी यांनी यावेळी सांगितले. या योजना गावागावांत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.