लाल दिव्यांना अखेरचा निरोप

सरकारी अधिकारी व मंत्र्यांच्या गाडय़ांवरील लाल दिवे काढून टाकण्याच्या निर्णयामागे व्हीआयपी संस्कृतीला तिलांजली देणे हा खरा हेतू आहे आता व्हीआयपी ऐवजी ईपीआय म्हणजे एव्हरी पर्सन इज इम्पर्ॉटट (प्रत्येक माणूस महत्त्वाचा) ही नवी संकल्पना मी मांडत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात सांगितले.

गाडय़ांवरील लाल दिवे काढण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी सांगितले की, आता देशातील १२५ कोटी लोक समान पातळीवर आले आहेत त्यांचे मूल्य व महत्त्व एकच राहील. लोकांना व्हीआयपी संस्कृतीचा तिटकारा होता, त्यामुळे कुणी मोठा किंवा महत्त्वाचा नाही हे दाखवण्यासाठी आम्ही मंत्री व इतर अधिकाऱ्यांच्या गाडय़ांवरचे लाल दिवे काढण्याचा निर्णय घेतला. लाल दिवे हे व्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक होते ती काहींची मनोवृत्ती बनली होती. अनुभवातून असे दिसते की, लाल दिव्यामुळे व्हीआयपी संस्कृती काही लोकांच्या डोक्यात  गेली होती. आता लालबत्ती गेली तरी व्हीआयपी संस्कृती काही लोकांच्या मनातून जाईल याची शाश्वती नाही. आम्ही प्रशासकीय निर्णय घेऊन ती संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला, पण मनोवृत्ती काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एकत्रित प्रयत्न केले तर व्हीआयपी मनोवृत्तीही जाईल.

नवभारतातील ईपीआय संस्कृती

आता नव भारतात ईपीआय संस्कृती उदयास येईल त्याचा अर्थ एव्हरी पर्सन इज इंपरटट, प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे असे सांगून ते म्हणाले की, जर आपण १२५ कोटी लोकांना सारखेच महत्त्व दिले तर त्यातून खूप मोठे सामथ्र्य निर्माण होईल व भव्य स्वप्ने साकार होतील. आपण सगळ्यांनी मिळून हे काम करायचे आहे.