पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप; ओडिशातील तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
देशातील प्रकल्प आणि धोरण दिरंगाईला काँग्रेसला जबाबदार धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याची संस्कृती रुजविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले.
इंडियन ऑइल कंपनीच्या सर्वात मोठय़ा ग्रीनफील्ड तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या राष्ट्रार्पणप्रसंगी ते बोलत होते. प्रकल्प दिरंगाईबाबत काँग्रेसला धारेवर धरताना ते म्हणाले की, आपण प्रकल्प सुरू केल्याचे काँग्रेसमधील मित्र बोलतात. असे समारंभ मला आवडत नाहीत. परंतु, हे प्रकल्प पंधरा वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असते, तर मला आनंद झाला असता. पूर्वी ५० वर्षांपूर्वी कल्पनानिर्मिती व्हायची. कागदावर उतरायला तिला १० वर्षे लागायची. तितकीच वर्षे कोनशिला बसवण्याच्या कामाला उजाडत. त्यानंतर काही वर्षांनी तो प्रकल्प अस्तित्वात यायचा. ओडिशामध्ये मागील साठ वर्षांत सुमारे २६ लाख एलपीजी जोडण्या देण्यात आल्या, तर पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी एका वर्षांतच या राज्यात ११ लाख जोडण्या दिल्या. कामे अशा पद्धतीने झाली पाहिजेत.
तत्पर कार्यवाहीची आवश्यकता प्रतिपादित करताना मोदी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी आपण सर्वानी प्रकल्प वेळेवर सुरू करण्याच्या आणि ते वेळेत तडीस नेण्याच्या संस्कृतीला जन्म देणे आवश्यक आहे.
सरकार ही संस्कृती रुजविण्याच्या प्रयत्नात आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ष्ट केले.

लाखो रोजगारांची निर्मिती
या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे ओडिशात लाखो रोजगार उपलब्ध होतील. या प्रकल्पातून ७८ कोटी किलो एलपीजी, ५०० कोटी लिटर पेट्रोल, ६६० कोटी लिटर डिझेल, २५० कोटी लिटर केरोसीन, २७ लाख क्विंटल सल्फर आणि १२० लाख क्विंटल पेट्रोलियम कोक यांची निर्मिती होईल. तसेच, शेतकऱ्यांसाठी या परिसरातील युरियानिर्मिती प्रकल्पांचेही पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे