भारत-पाकिस्तान संबंधांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
पाकिस्ताननेच स्वत:हून लादलेला दहशतवादाचा अडथळा दूर केला तर भारत-पाकिस्तान मैत्री गतिमान होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. शांतता स्थापनेचा मार्ग दुहेरी आहे, एकतर्फी नव्हे. आम्हाला सर्वच शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असेही ते म्हणाले. पाकिस्तानविरोधात या मुलाखतीत सूर तीव्र करतानाच मोदी यांनी चीनला मात्र झुकते माप दिले. सीमाप्रश्न सोडला तर गेल्या तीस वर्षांत चीनने एकही गोळी आमच्यावर झाडलेली नाही, असे विधानही त्यांनी केले.
पाकिस्तानने कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. पाकिस्तानने आमच्या देशात हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात कुचराई केली, त्यामुळे दोन्ही देशांतील संबंधात प्रगती होऊ शकली नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भारतीय सरहद्दीलगत चीनच्या सैन्याची जोरदार मोर्चेबांधणी झाल्याचा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा अहवाल असतानाच मोदी यांनी मात्र या मुलाखतीत चीनची पाठराखण केली. सीमाप्रश्न सोडला तर चीनच्या बाजूने आमच्या हद्दीत एकही गोळी गेल्या तीस वर्षांत मारली गेलेली नाही. उलट दोन्ही देशांतील नागरिकांचा परस्परसंपर्क वाढत आहे, व्यापार वाढत आहे, अशी भलामण केली. भारत आणि पाकिस्तानातील मुक्त व्यापारी पट्टा तसेच व्यापारवृद्धीसाठीच्या चीनच्या सागरी सिल्क रोड मोहिमेचीही त्यांनी पाठराखण केली. जगाने या बाबतीत चीनचा हेतू आणि त्यांचे उद्दिष्ट जाणून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सुचविले. अलिप्ततावाद चळवळीला आमचा पाठिंबा असून त्या धोरणात कोणताही बदल होणार नाही. अमेरिकेशी दृढ होत असलेल्या संबंधाबाबत बोलताना ओबामा यांच्यासोबतच्या मैत्रीचा त्यांनी उल्लेख केला.

‘ईशान्येकडील राज्यांकडे विशेष लक्ष’
शिलाँग- ईशान्येकडील राज्यांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य परिषदेच्या समारोपप्रसंगी स्पष्ट केले. हे दक्षिण आशियाचे प्रवेशद्वार आहे. त्याचा फायदा या राज्यांनी उठवावा असे आवाहन मोदी यांनी केले. शेजारी देशांसाठी रस्ते व रेल्वे मार्ग खुले करत आहोत. त्याचा आर्थिक फायदा या भागाला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पात ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या राज्यांमध्ये दहा हजार कोटींचे ३४ रस्ते प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेश तसेच मेघालय रेल्वेने जोडले जाईल, तर आगरतळा ब्रॉडगेजने जोडले जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.