१९९९ मध्ये एनडीए सरकारने दाखवलेल्या खंबीरपणामुळे कारगिल युद्धात भारताला निर्णायक विजय मिळाला. त्या वेळी अनेक सैनिकांनी प्राणांची आहुती दिली; त्यांचा त्याग विसरता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की, त्यावेळच्या राजकीय नेतृत्वाने १९९९ च्या कारगिल युद्धाच्यावेळी दाखवलेला खंबीरपणा महत्त्वाचा होता. त्याच्या अभिमानास्पद आठवणी सांगताना आनंदच वाटतो. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे, की आमच्या जवानांनी मोठय़ा संख्येने आलेल्या घुसखोरांना ज्या निर्भयतेने व धैर्याने चोख उत्तर दिले ते विसरता येणार नाही. अखेरच्या श्वासापर्यंत मातृभूमीसाठी लढणाऱ्या, वीरोचित बलिदानाने प्रेरणा देणाऱ्या जवानांच्या शौर्यापुढे मी नतमस्तक आहे. भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान मे ते जुलै १९९९ दरम्यान कारगिल युद्ध झाले होते. कारगिल क्षेत्रात सैनिकांनी महत्त्वाच्या ठिकाणी पवित्रा घेऊन पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावले. २६ जुलैला या युद्धाची अखेर झाली होती.

द्रास येथे श्रद्धांजली

कारगिलमध्ये द्रास येथे नॉर्दर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल डी.एस.हुडा यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांच्या स्मारकाठिकाणी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. द्रासमध्ये १७ वा कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. १९९९ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी केलेला हल्ला भारतीय जवानांनी परतवला होता. हुडा यांच्या समवेत लडाख येथील लेफ्टनंट जनरल एस.के.पटय़ाल होते, त्यांनी सांगितले,की हुतात्मा जवानांच्या पत्नी या वीर नारी आहेत. या वेळी दीपप्रज्वलन करून युद्धस्मारकाच्या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली. कारगिल व द्रास क्षेत्रातील युवक, मुले व स्थानिक नागरिक या वेळी उपस्थित होते.