संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्याच योजना नावे बदलून राबवत असल्याच्या आरोपावरून अत्यंत खोचक शैलीत काँग्रेसला चिमटे काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत टीकास्त्र सोडले.  ‘मनरेगा योजना’ काँग्रेस सरकारच्या अकार्यक्षमतेचा उत्तम नमुना असल्याने ही योजना अत्यंत वाजतगाजत सुरू ठेवणार असल्याची खोचक टीका मोदी यांनी करताच सभागृहात बसलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सर्वच काँग्रेस नेत्यांचे चेहरे खर्रकन उतरले.
सुमारे सव्वा तासाच्या भाषणात मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना खणखणीत प्रत्युत्तर दिले. तुमच्या जमीन अधिग्रहण विधेयकातील काही त्रुटी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यास सहकार्य करा; मी सार्वजनिकरीत्या या विधेयकाचे श्रेय तुम्हाला (काँग्रेस) देईन, या मोदींच्या राजकीय विधानावर सत्ताधारी खासदारांनी बाके वाजवून सभागृह दणाणून सोडले. मोदींच्या घणाघाती भाषणाचा समारोप मात्र त्यांच्या जुन्याच ‘आयडिया ऑफ इंडिया’च्या शैलीदार वाक्यांनी झाला.
पंतप्रधानांना संसदेत येण्यासाठी व्हिसा देऊ, या विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देताना मोदी अत्यंत आक्रमक झाले. प्रत्येक पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात असतो. त्यावरून माझ्यावर टीका करण्याऐवजी मी तिथे काय करतो, याचा मला जाब विचारा, असे म्हणून मोदी यांनी विरोधकांना धारेवर धरले. आपल्याकडे समस्या कायम आहेत; म्हणून त्याच त्याच योजना राबवाव्या लागतात. मात्र मनरेगासारखी योजना दीर्घकाळ चालू राहणे काँग्रेसच्या कारभाराचे अपयश असल्याचा घणाघाती हल्ला चढवून ही योजना सुरूच ठेवणार असल्याचे सूतोवाच मोदी यांनी केले. ही योजना बंद न करण्याइतपत राजकीय समज माझ्यात आहे, अशी कोपरखळी मोदींनी विरोधकांना मारली.
मोदींच्या भाषणात स्वच्छ भारत अभियान, जन-धन योजना, कोळसा खाण वितरण, ईशान्य भारतासाठी आखलेल्या विकास योजनांचा उल्लेख होता. ते म्हणाले की, जेव्हा राजकारणी स्वच्छतेवर बोलतात तेव्हा सारा देश त्याविषयी बोलू लागतो. त्यामुळे ‘स्वच्छ भारत’ योजना हाती घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या आसाम, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने केलेल्या विजयी कामगिरीकडे मोदींनी सभागृहाचे लक्ष वेधले.

हे तर सरकारचे यश
काळ्या पैशाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. त्यामुळे देशातील प्रत्येक जण या मुद्दय़ावर बोलू लागला. हे सरकारचे यश आहे.  धर्मातरण, लव्ह जिहाद आदी मुद्दय़ांवरून विरोधकांनी भाजपला नेहमीच धारेवर धरले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले की, धर्माच्या आधारावर कुणालाही भेदभाव करता येणार नाही. सरकारचा धर्म- ‘देश सर्वप्रथम’ तर ‘राज्यघटना’ हाच सर्वात मोठा धर्मग्रंथ आहे

नरेंद्र मोदींच्या भाषणातील अन्य ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:
* भ्रष्टाचाराची चर्चा होते, मी मानतो भ्रष्टाचाराने देश पोखरून ठेवला आहे. मात्र, भ्रष्टाचाराची चर्चा फक्त राजनैतिक कक्षेपुरती मर्यादित राहिली नाही पाहिजे, त्यामुळे त्या चर्चेला वैयक्तिक स्वरूप होते. त्यामुळे या मुद्द्यावर राजकारणाच्या कक्षेच्याबाहेर जाऊन चर्चा झाली पाहिजे. देशातील इतर समस्यांची चर्चा राजकीय कक्षेबाहेर जाऊन केली जाऊ शकत नाही, का असा सवालही नरेंद्र मोदींनी विरोधकांना केला.
* रस्ते शोधता येऊ शकतात ,भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करता येऊ शकते यासाठी उत्तम सुविधा दिल्या पाहिजेत.
* काळ्या पैशांचा विषय काढला की ज्यांच्या चेहऱ्याचा रंग उडायचा तेच आज संसदेत काळ्या पैशाविषयी आवाज उठवत आहेत, हे पाहून खूप बरे वाटते.
* सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षापूर्वी काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश देऊनही त्यावेळच्या सरकारने हे का केले नाही. मात्र आमचे सरकार आल्यानंतर पहिले एसआयटी स्थापण्याचा निर्णय घेतला गेला.
* काळ्या पैशाच्या चौकशीतून कोणताही दोषी सुटणार नाही. जो कोणी दोषी असेल, त्याला शासन होईल.
* एका बाजूला आपण शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करतो मग त्यांना समस्येतून बाहेर काढायला काहीतरी करायला नको का? पाण्याची टंचाई आपल्या देशात प्रमुख मुद्दा आहे. मग यापूर्वीच्या सरकारांनी पुढील ५०-६० वर्षांच्या काळाचे भान ठेवून नियोजन केले पाहिजे नव्हते का, असा सवाल मोदींनी सवाल उपस्थित केला.
* पीक घेण्याअगोदर जमिनीचा कस तपासला पाहिजे. रासायनिक खतांच्या मोठ्याप्रमाणावर वापराने जमीन नापीक झाली आहे.  त्यासाठी मातीची चाचणी करूनच पीक घेतले पाहिजे.
* यासाठी ग्रामीण भागात लेबोटरिज स्थापन करून तेथील स्थानिकांना प्रशिक्षित केले पाहिजे. १० वी १२वीच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागांतील शाळामध्ये मृदेचे परीक्षण करता येऊ शकते. माझ्या या प्रस्तावाची खिल्ली उडविली जाते. मात्र, एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, एका रात्रीत त्यासाठी करता येणार नाही, त्यासाठी प्राथमिक स्तरावरच काही उपाययोजना केल्या पाहिजेत
* माझे आंतरराष्ट्रीय दौरे आणि  बैठका यांवरून सध्या खिल्ली उडविली जात आहे. मात्र, सरकार कोणाचेही असो या गोष्टी  महत्त्वाच्या असतात, पण यावरूनच खिल्ली उडविली जावी, हे भारतीय राजकारणाचा दर्जा खालावल्याचे लक्षण आहे. तुम्हाला माझ्यावर टीका करायला दुसरे विषय उरले नाहीत का, असा सवाल मोदींनी विरोधकांना केला.
* भू-संपादन कायद्यात काही उणीवा असतील तर, आम्ही त्याबाबत विरोधकांशी चर्चा करून बदल करण्यास तयार आहोत.