सरकारस्थापनेनंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक समतोल राखत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची संख्या ६६वर नेली. राष्ट्रपती भवनात रविवारी दुपारी झालेल्या सोहळय़ात चार कॅबिनेट मंत्र्यांसह २१ मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, ऐन शेवटच्या क्षणी भाजपमध्ये दाखल झालेले शिवसेनचे नेते सुरेश प्रभू, चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर, मोदींचे कट्टर समर्थक जे. पी. नड्डा यांचा समावेश आहे. नव्या मंत्र्यांचे खातेवाटप रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र, आज, सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी खातेवाटप जाहीर केले जाईल, असे समजते.
केंद्रात सत्तास्थापन केल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ विस्तार केला.  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक चार जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तेथून राजीव प्रताप रूडी, गिरीराज सिंह, रामकृपाल यादव यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. केंद्रातील आधीच्या यूपीए सरकारच्या काळात कोळसा घोटाळा उजेडात आणणारे चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांना राज्यमंत्री बनवण्यात आले. तर अभ्यासू आणि कार्यक्षम अशी ओळख असलेले शिवसेनेचे नेते सुरेश प्रभू यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारातील शपथविधीत सहभागी न होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल, असा अंदाज बांधून शपथविधीपूर्वी प्रभू यांना भाजपचे सदस्यत्व देण्यात आले. शिवसेनेला काडीइतकेही महत्त्व न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनापूर्वक प्रभू यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर बहिष्कार टाकणाऱ्या शिवसेनेच्या जखमेवर यामुळे शब्दश: मीठ चोळले गेले आहे. विस्तारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची संख्या ६६ झाली आहे. मनोहर पर्रिकर यांच्या रूपात १९८७ नंतर पहिल्यांदाच गोव्याला कॅबिनेट मंत्री लाभला आहे.
*कॅबिनेट मंत्री – मनोहर पर्रिकर (गोवा), सुरेश प्रभू (महाराष्ट्र), जे.पी. नड्डा (हिमाचल प्रदेश), चौधरी वीरेंद्र सिंह (हरयाणा )
*राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) – राजीव प्रताप रूडी (बिहार), मुक्तार अब्बास नक्वी, डॉ़  महेश शर्मा (उत्तर प्रदेश),  बंडारू दत्तात्रेय (तेलंगणा)
*राज्यमंत्री – हंसराज अहिर (महाराष्ट्र), रामकृपाल यादव (बिहार), विजय सांपला (हरयाणा), मेजर राज्यवर्धन सिंह राठोड (राजस्थान), जयंत सिन्हा (झारखंड), बाबूल सुप्रियो (पश्चिम बंगाल), गिरिराज सिंह (बिहार), एच. पी. चौधरी, मोहन कंडोरिया (गुजरात), रामशंकर कटेरिया, सँवर लाल (राजस्थान), साध्वी निरंजन ज्योती (उत्तर प्रदेश).  वाय. एस. चौधरी (तेदप).

*गोव्याला प्रथमच कॅबिनेट मंत्रिपद, उत्तर प्रदेशचे वर्चस्व
*विस्तारात राजकीय गणितावर भर
*आठ महिला मंत्री
*अहिर यांना एकसष्टीची भेट दोन दिवस आधीच