जेव्हा आपण रामकृष्ण परमहंस यांचे नाव घेतो तेव्हा आपोआप आपल्या ओठावर स्वामी विवेकानंदांचे नाव येते. त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्यलढय़ात जेव्हा जेव्हा महात्मा गांधी यांचे नाव घेतले जाईल तेव्हा तेव्हा सरदार पटेल यांचे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. महात्मा गांधी हे सरदार पटेलांवाचून अपूर्णच ठरतील, असे सूचक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पटेल जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड कार्यक्रमात केले.
स्वातंत्र्याच्या वेळी देशाचे अखंडत्व अबाधित राखण्यात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री असलेल्या सरदार पटेल यांचे योगदान विसरून कसे चालेल, असा सवाल करीत ‘जे राष्ट्र इतिहास विसरते ते राष्ट्र स्वत: इतिहास निर्माण करू शकत नाही, या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विधानाचा दाखलाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिला.