भारतीय शेअर बाजारात १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा समजला जात आहे. जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये मोदी यांची प्रतिमा एखाद्या ‘रॉकस्टार’सारखीच असल्याचे त्यांच्या आदरातिथ्यावरून दिसत आहे, असे अमेरिकेतील आघाडीच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने केलेल्या प्रशंसेत म्हटले आहे.
एखाद्या ‘रॉकस्टार’ला देण्यात येणारी वागणूक जगातील अनेक गुंतवणूकदार मोदी आणि भारताला देत आहेत. भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी जवळपास १६.५ अब्ज डॉलर इतका पैसा ओतला आहे. एखाद्या विकसनशील देशातील ही सर्वाधिक गुंतवणूक असेल, असे ‘जर्नल’ने म्हटले आहे.
मुंबई शेअर बाजाराने यंदा ३५ अंशांनी उसळी घेतली आहे. २०१४ मधील ही ५४ पट अशी विक्रमी उसळी आहे. यात सिमेंट उत्पादकांपासून बँका आणि विविध कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. यात मोदी सरकारच्या वित्तीय धोरणाचा मोठा वाटा आहे.
‘ब्रिक्स’ देशांच्या गटातील भारत हा यंदा अधिक वेगाने आर्थिक विकासाच्या दृष्टीने अधिक विस्तारणारा देश असेल. ब्राझिल, रशिया व चीन यांच्या जोडीने भारताची वाटचाल असेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवलेल्या अंदाजात भारतातील विकासाचा दर पुढील वर्षांत ६.४ टक्केपर्यंत पोहोचेल. भारतातील गुंतवणुकीत जगातील मोठमोठय़ा वित्तीय संस्थांना स्थिर, जास्तीतजास्त परतावा मिळत आहे, असेही पुढे या वृत्तपत्राने म्हटले आहे.