‘‘विरोधकांसाठी सत्ता एक उपभोग्य वस्तू आहे. सत्ता उपभोगण्यासाठीच ते राजकारण करतात. म्हणून तर विरोधी बाकांवर कसे बसायचे असते, हेच त्यांना समजतसुद्धा नाही. सरकारविरोधात कोणतेही ठोस मुद्दे नसताना, भ्रष्टाचाराचा डाग नसतानाही विरोधक अतिशय आक्षेपार्ह भाषेचा वापर करीत आहेत; पण भाजप त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. आपली बांधिलकी जनतेशी असली पाहिजे. आपण सुशासनाचे राजकारण केले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये केले.’’ केंद्रात आणि १९ राज्यांमध्ये सत्ता आपल्याला मिळालीय. त्यावरून जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांचा अंदाज करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपसारखी संघटना अन्य कोणत्याही पक्षात नसल्याची टिप्पणी करीत ते म्हणाले, ‘‘एक राजकीय पक्ष म्हणून निवडणुका लढविणे आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविक आहे; पण निवडणुका जिंकणे हेच एकमेव उद्दिष्ट असता कामा नये. मूळ उद्दिष्ट तर जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करणे असले पाहिजे. त्यासाठी निवडणुकांपलीकडेही पक्षाला जावे लागेल. निवडणुकीच्या राजकारणाचे रूपांतर जनतेच्या भागीदाराशी जोडले पाहिजे. स्वच्छता मिशन, एलईडी दिव्यांच्या वापराला प्रोत्साहन, लसीकरण यांसारख्या अनेक गोष्टी फक्त सरकारवर सोडून चालणार नाहीत. जनता व सरकार यांच्यामध्ये जोपर्यंत कार्यकर्ता दुवा होणार नाही तोपर्यंत जनतेला विकासकार्यात जोडता येणार नाही.’’  बैठकीत विविध प्रकारचे प्रस्ताव मंजूर झाले. रोहिंग्याप्रकरणी ठोस भूमिका, काश्मिरातील दहशतवादी कारवायांविरुद्ध ठाम लष्करी कारवाई, इतर मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय, डोकलाममधील विजय आदींचा उल्लेख त्यामध्ये आहे.

‘सत्ता सुखासाठी नाही फक्त जनसेवेसाठी’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा मंत्र-जेटली

विचारधारा मान्य असल्यासच राणेंचा भाजपप्रवेश शक्य

नारायण राणे यांना भाजपच्या विचारधारेनुसार काम करणे शक्य असेल तर त्यांना पक्षात घेण्याबाबत जरूर विचार केला जाण्याची सूचक प्रतिक्रिया सोमवारी भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी दिली. ‘‘राणे यांचा भाजपच्या विचारधारेवर विश्वास आहे का? भाजपच्या पद्धतीने काम करणे त्यांना शक्य आहे का? तसे असेल तर त्यांना पक्षात घेण्याबाबत निश्चित विचार केला जाईल आणि तो अमित शहाच घेतील,’’ अशी टिप्पणी त्यांनी केली. पांडे यांच्या रूपाने राणे यांच्याबाबत पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्याकडून प्रथमच प्रतिक्रिया आली आहे.

भाजपचा कामगिरीवर, तर काँग्रेसचा घराणेशाहीवर विश्वास आहे. म्हणून तर नरेंद्र मोदी आणि रामनाथ कोविंद हे देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकले. याउलट घराणेशाहीचे बिनदिक्कत समर्थन करून राहुल गांधींनी देशवासीयांच्या भरीव योगदानाला नाकारत आहेत; पण त्यांनी लक्षात घ्यावे, की त्यांच्या घराणेशाहीला जनतेने कधीच नाकारलेय..

अमित शहा, पक्षाध्यक्ष

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आणण्याचे काम मोदींनी केले. तसेच दहशतवादाचा बीमोड करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे जगाला पटवून देण्यातही मोदी यशस्वी झाले. अगदी पाकच्या कारवायांचा निषेध करण्यास त्यांनी चीनला बाध्य केले. डोकलामचा संघर्ष हाताळताना तर त्यांनी राजनैतिक मुत्सद्दीपणाचे प्रदर्शन घडविले..

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री