पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेच्या दोन्ही सभागृहातील भाजपचे संसदीय पक्षनेते म्हणून शनिवारी निवड करण्यात आली, तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भाजपचे लोकसभेतील उपनेते म्हणून, तर अर्थमंत्री अरुण जेटली यांची राज्यसभेतील उपनेते म्हणून निवड करण्यात आली.
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या भाजपच्या संसदीय पक्ष कार्यकारिणी समितीने ही निवड केली. संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांची संसदेतील सरकारचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय ते पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून दोन्ही सभागृहात काम पाहतील.
लोकसभेत १३ प्रतोद आणि राज्यसभेत ३ प्रतोदांची नियुक्ती करण्यात आली. यात प्रकाश जावडेकर, संजय धोत्रे, अर्जुन राम मेघवाल, अविनाश राज खन्ना, गणेश सिंग, भूपेंद्र यादव यांचा समावेश आहे. भाजपच्या संसदीय पक्षाचे खजिनदार म्हणून पी. सी. मोहन यांची निवड करण्यात आली.