पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे नेपाळमध्ये भरणाऱ्या सार्क परिषदेला हजर राहणार असून त्यावेळी दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या शिखर परिषदेच्या पाश्र्वभूमीवर मोदी आणि शरीफ यांची भेट होईल, अशी शक्यता ‘दी एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने वर्तविली आहे. परस्पर चर्चेच्या वेळी पोषक वातावरण असावे यासाठी परंपरेनुसार दोन्ही नेते एकमेकांना समोरासमोर भेटतील, असे सांगण्यात येत आहे.
सार्क देशांच्या नेत्यांशी शरीफ परस्परसंबंध आणि प्रादेशिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. मात्र सार्क नेत्यांशी चर्चा करणार असले तरी शरीफ हे मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत की नाही, ते कळू शकलेले नाही. या बाबत भारताकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.