आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी गांधीनगर येथे आईची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे आणि भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीही मोदींना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बुधवारी आपला ६४ वा वाढदिवस साजरा करणारे पंतप्रधान मोदी अहमदाबादपासून २३ किलोमीटरवर असलेल्या गांधीनगर येथे एका साध्या गाडीतून कुठल्याही संरक्षणाशिवाय आपली आई हिराबेन यांना भेटण्यासाठी गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आईने जम्मू-काश्मिर येथील पूरग्रस्थांच्या मदतीसाठी पंतप्रधान मदत निधीमध्ये पाच हजार रूपयांची मदत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांनीही मोदींना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी नुकतीच जपानला भेट दिली होती.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनीसुध्दा पंतप्रधानांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.