राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे पाठ फिरविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि नितीशकुमार यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा असतानाच झालेल्या या भेटीमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ‘‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असे या भेटीचे स्वरूप होते’’ असा दावा करत नितीशकुमार यांनी ही भेट राजकीय नव्हती, असे स्पष्ट केले.

मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जुगनौथ यांच्या स्वागतासाठीच्या मेजवानीसाठी नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांना निमंत्रित केले होते. सोनिया गांधींनी शुक्रवारी घेतलेल्या विरोधकांच्या बैठकीला दांडी मारणारे नितीशकुमार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांनी नितीशकुमार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र या भेटीतून राजकीय अर्थ काढू नये, असे नितीशकुमार म्हणाले.

‘‘मी जनता दल (संयुक्त) पक्षाचा अध्यक्ष म्हणून नव्हे तर बिहारचा मुख्यमंत्री म्हणून मोदी यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती. या भेटीतून माध्यमे वेगळा अर्थ का काढत आहेत?’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘‘मॉरिशसची निम्मी लोकसंख्या मूळची बिहारची असल्याने या देशाशी बिहारचे भावनिक बंध जोडलेले आहेत. त्यामुळेच मोदी यांनी दिलेले या कार्यक्रमाचे निमंत्रण मी स्वीकारले,’’  असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. ‘‘सोनिया गांधी यांच्याशी गेल्याच महिन्यात भेट झाली होती. शुक्रवारी त्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव उपस्थित राहतील हे तेव्हाच ठरले होते,’’ असेही नितीशकुमार म्हणाले.

बिहारमधील गंगानदीपात्रातील स्वच्छतेसाठी १० जूनपूर्वी केंद्रातील तज्ज्ञ पथक पाठविण्याची विनंती पंतप्रधानांना केल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावरील भ्रष्टाचारासंदर्भातील प्रश्नांना मात्र नितीशकुमार यांनी बगल दिली.