modi-450
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वादग्रस्त सूटचा लिलाव करण्यात येत असून, हा सूट मोदींनी गेल्या महिन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान परिधान केला होता. सूटवर मोंदीच्या नावाची अक्षरे असल्याने मोदींचा हा सूट चर्चेचा विषय झाला होता. यावेळच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचा पंतप्रधान म्हणून जवळजवळ नऊ महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यादरम्यान त्यांना भेट म्हणून मिळालेल्या जवळजवळ ४५५ वस्तूंचा लिलाव येथे करण्यात येणार आहे. राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मोदींच्या ‘त्या’ वादग्रस्त सूटचादेखील यात समावेश आहे. या लिलावातून मिळणारी धनराशी पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ गंगा अभियान’ या महत्वाकांक्षी योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. सुरतचे पालिका आयुक्त मिलिंद तोरवणे यांनी वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, तीन दिवस चालणाऱ्या लिलावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सूट आणि पंतप्रधान म्हणून काम करत असताना भेटस्वरुपात मिळालेल्या अन्य ४५५ वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. पंतप्रधानांशी संबंधित वस्तू हा राष्ट्रीय खजिना असून, या वस्तूंच्या लिलावातून मिळणाऱ्या धनराशीचा विनियोग ‘स्वच्छ गंगा अभियाना’साठी केला जाईल. पंतप्रधानांच्या कार्यालयाने लिलावाचे आयोजन सूरतमधील सिटी-लाईटस् रोडवरील ‘सायन्स कन्व्हेशन सेंटर’मध्ये केले आहे.