जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी तेथील मतदारांनी गोळ्यांच्या वर्षांवाला न जुमानता निर्भयपणे मतदान केले हा लोकशाहीचा विजय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यातील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केले. बंदुका आणि बॉम्बचा वापर करून कितीही निष्पापांचे प्राण घेतले असले तरीही राज्यात लोकशाही जिवंत असल्याचे सिद्ध झाल्याने दहशतवाद्यांना नैराश्याने ग्रासले आहे, असेही मोदी म्हणाले. राज्यात २ डिसेंबर रोजी मतदानाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. आम्हाला कोणीही दहशत दाखवू शकत नाही, हेच मतदारांनी सिद्ध केले, असे ते म्हणाले.
दहशतवाद्यांच्या गोळ्यांना न जुमानता मतदारांनी भरघोस मतदान केले त्याबद्दल मोदी यांनी जनतेचे अभिनंदन केले आहे. गेल्या ३० वर्षांत राज्याचा विकास झालेला नाही आणि त्याला नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लूट थांबविण्यासाठी एकदा भाजपला संधी द्या, गेल्या ३० वर्षांत जो विकास झाला नाही तो पाच वर्षांत करून दाखवितो, असेही मोदी म्हणाले.