नोटाबंदीवरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सो़डले आहे. मोदी अलिबाबा असल्यासारखे गोपनीयता बाळगत आहेत, पण ते एका संवैधानिक पदावर आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या गोंधळाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मोदी फक्त भाषण देतात, पण ते जनतेला उत्तर देत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करुन गुरुवारी एक महिना झाला. महिनाभरानंतरही बँकेबाहेर रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदींसारख्या हुकूमशहामुळे देशात आर्थिक आणीबाणी लागू झाली असे त्या म्हणाल्यात. नोटाबंदीच्या निर्णयामागचा छुपा अजेंडा आता समोर येतोय. मोदी आणि त्यांच्या निकटवर्तीयांना या निर्णयाचा फायदा झाल्याचा आरोप त्यांनी केला. भारताच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

संसद ही जनतेला बांधील असते. पण नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी संसदेलाही विश्वासात घेतले गेले नाही. एका माणूस देशात मोठी आपत्ती आणू शकतो हे मोदींनी सिद्ध केल्याची टीका त्यांनी केली. नोटाबंदीनंतर काळा पैशावर चाप बसेल असे सांगितले गेले. पण काळा पैसा कुठे आहे, हा तर जनतेचा करदात्यांचा पैसा, निर्णय घेण्यापूर्वी कोणालाची विचारण्यात आले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. मोदींना जनतेची चिंता नाही, त्यांनी जनतेचे पैसे लुटल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची गाडी रुळावरुन घसरली आहे असे त्यांनी नमूद केले.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावरही ममता बॅनर्जी बरसल्या आहेत. गव्हर्नरही नोटांबदीवर मौन बाळगून आहेत. नोटांविषयी कोणीही सविस्तर माहिती देत नाही असे त्यांनी सांगितले. उर्जित पटेल हे मोदींसोबत आहेत, पण त्यांनी स्वतःचे काम चोखपणे बजावले पाहिजे अशी आठवणही त्यांनी पटेल यांना करुन दिली.