आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी वाराणसी मतदारसंघातून आपला निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. मोदी आणि गांधी हे दोन्ही नेते केवळ हेलिकॉप्टरमधून फिरत असल्याचा मुद्दा पकडत तुम्हाला हेलिकॉप्टर डेमोक्रॅसी हवी आहे की प्रत्येकाच्या घराघरांत जाणारी लोकशाही हवी आहे, असा सवाल त्यांनी वाराणसीच्या जनतेला विचारला.
उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी प्रचारफेरी काढली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी प्रमुख विरोधक मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, अमेठीमध्ये राहुल गांधी केवळ हेलिकॉप्टरमधून फिरतात. त्यांचे सुरक्षारक्षक अमेठीतील मतदारांना मारहाण करतात. मोदीदेखील उद्या आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरमधूनच इथे येणार आहेत. तुम्हाला अशी हेलिकॉप्टर डेमोक्रॅसी हवी आहे का, असा प्रश्न त्यांनी वाराणसीतील जनतेला विचारलाय. राहुल गांधी यांनी अमेठीतील जनतेची फसवणूक केली आहे. वाराणसीतील जनतेचे असे काही होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या निवडणूक लढविण्यासाठी पैसा नाही. तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे, असे सांगतानाच राहुल गांधी आणि मोदी निवडणूक प्रचारासाठी पैसा कुठून आणतात, असा प्रश्न त्यांनी विचारला.