पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय घौडदौड सुरूच असून जपानमधील एका रिसर्च कंपनीच्या नुकत्याच जाहिर झालेल्या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी हे जगातील दुसर सर्वाधिक कार्यकुशल (परफोर्मिंग) नेते ठरले आहेत. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना अव्वल स्थानाचा मान मिळाला आहे.
जपान स्थित एका रिसर्च कंपनीने जगातील कार्यकुशल नेत्यांची ३० जणांची यादी तयार केली. यासाठी तब्बल ३० देशांतील सुमारे २६ हजारांहून अधिक जणांची मतं जाणूने घेण्यात आली. यामध्ये दहा गुणांच्या निर्देशानुसार चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग ७.५ गुणांसह पहिल्या स्थानावर, तर मोदी ७.३ गुणांसह दुसऱया स्थानावर आहेत. मोदींच्या पाठोपाठ जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल ७.२ गुणांसह तिसऱया स्थानावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ६.६ गुणांसह चौथे स्थान देण्यात आले आहे आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून ६.५ गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. या सर्वेक्षणात आशियातील १२, आफ्रिका आणि अमेरिका खंडातील प्रत्येकी चार, युरोपमधील आठ तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, देशांतर्गत आणि परराष्ट्रविषयक प्रश्नांसंदर्भात जनतेचा देशाच्या सर्वोच्च नेत्यावर किती विश्वास आहे यावर देखील सर्वेक्षण घेण्यात आले. यामध्ये देखील चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी बाजी मारली तर, मोदी यातही दुसऱया स्थानावर आहेत.