गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पुढील वर्षी होणाऱया लोकसभेच्या निवडणुकीचे प्रचार समितीचे प्रमुखपद देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. पुढील महिन्यात याची औपचारिक घोषणा करण्यात येईल. मोदी यांना पक्षाने पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, यासाठी भाजपमधील काही नेते दबाव टाकत आहेत. त्याचवेळी मोदी यांच्याकडे निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असलेल्या प्रचार समितीचे प्रमुखपद देण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्याबाबत अजून पक्षाने आपली भूमिका जाहीर केली नसली, तरी गुजरातमध्ये त्यांनी केलेल्या विकासकामांचा मुद्दा पुढे करून केंद्र सरकारमध्येही सुशासन आणण्याचे मतदारापुढे मांडले जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुखपद द्यायला हिरवा कंदील दाखविला आहे.
सद्यस्थितीत मोदी हेच सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे भाजपमधील काही नेत्यांना वाटत असल्यामुळेच त्यांच्याकडे निवडणुकीतील महत्त्वाचे पद देण्यात येईल. पुढील महिन्यात पक्षाच्या कार्यकारी मंडळाची आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक होत असून, तिथेच मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात येईल.
मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुख करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. मध्यंतरी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा राजनाथसिंह यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतरही या निर्णयामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
काही राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका येत्या वर्षभरात होत आहेत. त्यासाठी राजनाथसिंह यांनी पक्षामध्ये छोटे गट तयार केले असून, त्यांच्या माध्यमातून अधिक सविस्तर कार्यक्रम तयार करण्यात येतो आहे. अर्थव्यवस्था, प्रशासन, पारदर्शकता आणि अंतर्गत व बाह्य सुरक्षा या सर्व मुद्द्यांवर पक्षाची ठोस भूमिका मतदारांपुढे मांडण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.