चार निवृत्त अधिकाऱ्यांना संधी; खातेबदलातही आणखी धक्क्य़ांची शक्यता

पुन्हा एकदा सर्वाना चकवा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी रात्री आपल्या पोतडीतून नऊ नव्या चेहऱ्यांची नावे बाहेर काढली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह, डॉ. मनमोहनसिंग सरकारमध्ये गृहसचिव असलेले आर. के. सिंह, संयुक्त राष्ट्रांतील भारताचे माजी कायम प्रतिनिधी ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी हरदीपसिंग पुरी आणि केरळमधील निवृत्त आयएएस अधिकारी अल्फान्सो कन्ननथानम आदींचा मोदी मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. निवडक नोकरशहांमार्फत राज्य कारभार हाकणे पसंत करणाऱ्या मोदींनी यावेळी थेट मंत्रिमंडळामध्येच त्यांना स्थान दिले आहे.

आज, रविवारी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रपती भवनामध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव, ओम माथूर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, लोकसभा उपसभापती एम. थंबीदुराई यांच्यापासून आसामचे मंत्री हेमंता बिश्व सरमा यांच्यापर्यंत अनेकांची नावे माध्यमांतून झळकत होती. परंतु एकटय़ा सत्यपाल सिंहांचा अपवाद वगळता मोदींनी निवडलेले नऊच्या नऊ  चेहरे अनपेक्षित आहेत. त्यात चार निवृत्त नोकरशहांच्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातून राज्यसभेत असलेले शिवप्रतापसिंह शुक्ला, बिहारमधील बक्सर येथून पाच वेळा विजयी झालेले अश्विनीकुमार चौबे, मध्य प्रदेशातील टिकमगडमधून सहा वेळा विजयी झालेले वीरेंद्र कुमार, उत्तर कन्नडमधील प्रभावशाली खासदार अनंतकुमार हेगडे, जोधपूरचे खासदार गजेंद्रसिंह शेखावत आदींचा समावेश आहे. २०१९मधील लोकसभा डोळ्यासमोर ठेऊनच मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांची निवड केली जाईल अशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र मुरलेल्या राजकारण्यांऐवजी मोदी-शहा यांनी निवृत्त नोकरशहांवर भिस्त ठेवल्याचे दिसते. यातील आर. के.सिंह यांची निवड अधिकच आश्चर्यकारक मानली जाते. भाजपमध्ये नाराज असलेल्या सिंह यांनी मध्यंतरी मोदी व शहांवर अप्रत्यक्ष टीका सुरू केली होती. पण तरीही त्यांच्यावर विश्वास दाखविला गेला. ते यूपीए-२ मध्ये गृहसचिव होते. त्यांचा मोठा उपयोग होईल, असे गृहित धरले असावे. अशीच आश्चर्यकारक निवड हरदीपसिंह पुरी यांची आहे. राजनैतिक वर्तुळात अतिशय प्रतिष्ठित नाव असलेल्या पुरींकडे कोणती जबाबदारी दिली जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरेल. संजीव बालियान या उत्तर प्रदेशातील जाट नेत्याला ‘सुट्टी’ देऊन त्यांच्याऐवजी बागपतमधून निवडून आलेल्या सत्यपालसिंहांना प्राधान्य देण्यात आले. या नोकरशहांपैकी पुरी आणि कन्ननथनम हे कोणत्याही सभागृहाचे खासदार नाहीत. त्यांना सहा महिन्यांच्या आत राज्यसभेवर निवडून आणावे लागेल.

शिवसेना, संयुक्त जनता दलाच्या हाती धुपाटणे : आजचा फेरबदल फक्त भाजपपुरताच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेना व नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या हाती धुपाटणे आल्याचे म्हणता येईल. आणखी एक मंत्रिपद मिळणार असल्याने त्यासाठी शिवसेनेमध्ये चढाओढ लागली होती. तसेच संयुक्त जनता दलाकडून संतोष कुशवाह व आर. सी. पी. सिंह यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील होती. मात्र, त्यांना स्थान नसल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. अण्णाद्रमुकबाबत तर अधिकच गोंधळ आहे. कदाचित रविवारी सकाळी आणखी एक-दोन नावांची भर पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

महत्वाचे असे..

  • महाराष्ट्रातून नवा चेहऱ्याला संधी मिळाली नाही. विनय सहस्रबुद्धे व सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या नावाची चर्चा होती. शिवसेनेलाही आणखी एक मंत्रिपद मिळाले नाही. सध्या महाराष्ट्रातील सात जण मंत्रिमंडळामध्ये आहेत.
  • किमान वीस मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे. तसेच निर्मला सीतारामन, उमा भारती, यांच्यावरील राजीनाम्याची संक्रांत टळल्याचेही सांगितले जात आहे.
  • नव्या चेहऱ्यांची उत्सुकता संपली असली, तरी खातेवाटपाबाबतचे गूढ कायमच राहिले आहे. शनिवारी रात्री उशीरासुद्धा नवा संरक्षणमंत्री कोण, गडकरींकडे अतिरिक्त मंत्रालय येणार का आणि सुरेश प्रभू यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार हे स्पष्ट झाले नव्हते.