भारताच्या परंपरा, रीतीरिवाज आणि संस्कृतीनेच हा देश टिकवून ठेवला आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. नवी दिल्ली येथे झालेल्या उगाडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. उगाडी म्हणजे तेलुगु नववर्ष. या निमित्त जमलेल्या लोकांना त्यांनी उगाडीच्या शुभेच्छा दिल्या आणि भारतीय संस्कृतीचे त्यांनी गुणगान केले. भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे असे आपण नेहमी म्हणतो. याच विविधतेनी भारतीय परंपरा नटलेली आहे आणि त्याच परंपरांनी देशातील सर्वांना एकत्र बांधण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. ही वैविध्यता आपण जपली पाहिजे तसेच दुसऱ्या राज्यातील संस्कृती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे ते म्हणाले.

देश स्वतंत्र झाल्यावर केवळ हिंदी भाषेचा प्रचार करण्यात आला. परंतु त्याबरोबरच इतर भाषांचे सौंदर्य आणि त्यांची उपयुक्तता जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला असता तर आज देशात काहीसे वेगळे चित्र दिसले असते असे ते म्हणाले. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक चालीरिती आणि परंपरा आहेत. त्यांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत परंतु त्या मागचा सांस्कृतिक गाभा एकच आहे असे ते म्हणाले. तेलंगणा आणि हरियाणा राज्यांनी एक करार केला आहे. त्या करारानुसार दोन्ही राज्य एकमेकांची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. हा उपक्रम येथील शाळांमध्ये राबवला जाणार असल्याचे ते म्हणाले.

शाळातील मुलांना एकमेकांच्या संस्कृतीची जाणीव होईल यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे असे ते म्हणाले. याबरोबरच अनेक राज्यांनी पुढाकार घेऊन असे करार करावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले. दहशतवादाचा प्रश्न जगाला भेडसावू लागला असल्याचे ते म्हणाले. दहशतवादाने सर्व जगालाच आव्हान दिले असल्याचे ते म्हणाले. हे आव्हान पेलण्याची पात्रता आपल्या अंगी यावी अशी या पवित्र दिवशी आपण प्रार्थना करत आहोत असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हे देखील उपस्थित होते.