डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने एच १ बी व्हिसावर निर्बंध लादण्याची तयारी सुरू केलेली असताना, कुशल व्यावसायिकांबाबत अमेरिकेनी संतुलित धोरण राबवावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
अमेरिकेच्या शिष्ट मंडळासमोर दिलेल्या भाषणात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. जर डोनाल्ड ट्रम्प यांनी एच १ बी वर कडक निर्बंध लादले तर त्याचा सर्वाधिक फटका भारतातून अमेरिकेत गेलेल्या माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना होईल. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातील परिणाम नजरेसमोर ठेऊनच हा निर्णय घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

अमेरिकेतून २६ खासदारांचे शिष्टमंडळ नवी दिल्लीमध्ये आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. अमेरिकेसोबत असलेले द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी उत्सुकता दाखवल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशाच्या समृद्धीसाठी आपण एकेमकांच्या साहाय्याने काम करू शकतो असे पंतप्रधान यांनी म्हटले. अमेरिकेला समृद्ध बनविण्यासाठी भारतातील माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांनी कष्ट घेतले आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

अमेरिकेच्या उभारणीत भारतीयांचे योगदान आहेत तर भारताच्या जडण-घडणीत अमेरिकेने मनापासून सहकार्य केले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. या बैठकीनंतर माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी भारत आणि अमेरिका मिळून अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र काम करणार असल्याचे सांगितले. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याचे या शिष्टमंडळाचे प्रमुख खासदार बॉब गुडलाट्टे यांनी म्हटले. या बैठकीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या अमेरिकेत येण्यासाठी वर्षाला ६५,००० एच १ बी व्हिसा दिला जातो.

बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना हा व्हिसा दिला जातो. याचा फायदा भारतातून अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करण्यासाठी जाणाऱ्यांना होतो.  बाहेरील देशातील लोक येथे येतात आणि कमी पगारावर काम करण्यास तयार असतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाहीत अशी ओरड डोनाल्ड ट्रम्प हे करतात. त्यामुळे आपण एच १ बी व्हिसा आणि इतर कामकाजासाठी देण्यात येणाऱ्या व्हिसावर कडक निर्बंध लादू असे त्यांनी म्हटले होते.