पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोर्तुगाल, अमेरिका व नेदरलँड्स या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत त्यात ते या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यांचा दौरा चार दिवसांचा असून अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदी यांची वॉशिंग्टन येथे २६ जून रोजी चर्चा होणार आहे.

अमेरिका भेटीच्या आधी मोदी यांनी म्हटले आहे की, भारत व अमेरिका यांच्यातील संबंधात या दौऱ्यामुळे प्रगती होईल. ट्रम्प यांच्या निमंत्रणानुसार मोदी हे अमेरिकेला भेट देत आहेत. ट्रम्प व  त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी तसेच अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.

परदेश दौऱ्यात ते प्रथम पोर्तुगालला भेट देणार असून त्यात ते पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही देशातील संबंधांच्या दृष्टिकोनातून काय प्रगती घडून आली याचा चर्चेत आढावा घेतला जाईल असे मोदी यांनी म्हटले आहे. अमेरिका भेटीनंतर मोदी हे नेदरलँड्सला जाणार असून त्यावेळी ते पंतप्रधान मार्क रूट व राजे विल्हेम अॅलेक्झांडर तसेच राणी मॅक्सिमा यांची भेट घेतील. भारत व नेदरलँड्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी सत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. दहशतवाद व हवामान बदल यासारख्या मुद्दय़ांवर पंतप्रधान रूट यांच्याशी चर्चा केली जाणार असून द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचा आढावा घेतला जाईल असे मोदी यांनी म्हटले आहे.