कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी मोदी यांनी प्रार्थना केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी मोदींवर विविध माध्यमातून टीका करीत आहेत. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी आणि गरिबांच्या विरोधातील आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखाली सरकार सूट-बूटवाल्यांचे सरकार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. राहुल गांधी यांचे ट्विटरवरील अधिकृत अकाऊंट ‘ऑफिस ऑफ आरजी’ला मोदींच्या ट्विटमध्ये मेन्शन करण्यात आले आहे.