गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजधानी दिल्लीच्या पिचवर जोरदार बॅटिंग करीत गुजरातच्या प्रगतीचे गोडवे गायले. भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास हाच आमचा मंत्र असल्याचे सांगत मोदी यांनी आपल्या पुढील वाटचालीची दिशाही अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली.
येथील श्रीराम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी मोदी यांनी बुधवारी संवाद साधला. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण सभागृह विद्यार्थ्यांनी गच्च भरले होते. मी काही शिक्षक नाही, त्यामुळे ४५ मिनिटांत भाषण संपवता येणार नाही, असे सुरुवातीलाच स्पष्ट करीत मोदी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात गुजरात कसा अग्रेसर आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
ते म्हणाले, शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. त्यामुळे शेतकऱयाच्या भल्यासाठी गुजरात सरकारने विविध योजना राबविल्या. शेतकऱयांना आम्ही सॉईल हेल्थ कार्ड दिले. त्यामुळे त्यांना आपल्या जमिनीची प्रतवारी नेमकेपणाने समजली. याचा परिणाम गुजरातमधील कृषी विकासदर दहा टक्क्यांवर पोचला आहे. संपूर्ण देशात भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असताना केवळ गुजरातमध्ये उलट परिस्थिती आहे. फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन हाच गुजरातच्या विकासाचा मंत्र आहे. आज युरोपमध्ये भेंडी गुजरातमधून जाते. दिल्लीमध्ये दूधही गुजरातमधून येते, याकडे त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
नाव न घेता त्यांनी आपल्या भाषणात कॉंग्रेसवर टीका केली. स्वातंत्र्य मिळाले, मात्र, सुराज्य अजून आलेले नाही. विकासासाठी सकारात्मक विचारांची गरज आहे, असे सांगून ते म्हणाले, स्किल, स्केल, स्पीड या तीन गोष्टी आम्ही आत्मसात केल्या आहेत. केवळ देखेंगे, करेंगे असे म्हणत बसून आता चालणार नाही. जग खूप वेगाने पुढे जातंय. संधीचे सोने करतेय. आपणही वेगाने काम करण्याची मानसिकता बनवली पाहिजे.
आपल्याकडे साधारणपणे सहा फुटाच्या व्यक्तीची पोलिस दलात भरती केली जाते. यामध्ये व्यक्तीची केवळ शारीरिक ताकद बघितली जाते. मात्र, गुजरातमध्ये आम्ही सुरक्षा दलांमध्ये जाणाऱया व्यक्तींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र संस्था सुरू केली आहे. त्यामध्ये विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या विद्यार्थ्यांना कायद्याचे, घटनेचे, उपयुक्त तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाते. त्यामुळेच आज आमच्या राज्यातील कॉन्स्टेबलही तंत्रकुशल आहे, असे मोदी म्हणाले.