अमेरिकेच्या अवकाशवीराने पहिले स्पेसवॉक केल्याच्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त नासाने एक वृत्तपट तयार केला असून हॉलिवूडचे अभिनेते जॉन क्रायर यांनी त्याला स्वरसाज चढवला आहे. ३ जून १९६५ रोजी नासा व अमेरिकेचे अवकाशवीर एड व्हाइट यांनी पहिल्यांदा स्पेस वॉक केले होते. नासा या स्पेस वॉकची पन्नाशी साजरी करणार आहे. स्पेस वॉक ही अवकाशातील अत्यंत साहसी कृती असते. यानाबाहेर जाऊन त्याची दुरुस्ती करण्यासाठी शक्यतो स्पेस वॉक केले जाते. १ जूनला नासा स्पेसवॉक चा इतिहास व माणसाच्या अवकाशातील आगामी प्रकल्पांचा वेध त्यात घेतला आहे. या वृत्तपटाचे नाव ‘सूट अप’ असे असून नासा टेलिव्हिजनवर तो दाखवला जाणार आहे. नासाच्या संकेतस्थळावर तसचे यू टय़ूब खात्यावरही तो प्रदर्शित होईल. नासाचे प्रशासक व अवकाशवीर चार्लस बोल्डेन व उपप्रशासक तसेच स्पेससूट डिझायनर डॅव्हा न्यूमन यांच्या मुलाखती त्यात आहेत. इतर अवकाशवीर, अभियंते, तंत्रज्ञ व स्पेसवॉकच्या इतिहासातील चमकदार क्षणांचे साक्षीदार यांच्याही मुलाखती आहेत. स्पेस सूट कसा तयार केला जातो इथपासून ते स्पेसवॉक कसा केला जातो यापर्यंतची माहिती या एचडी वृत्तपटात दिली आहे. यावेळी नासाचे अवकाशवीर माईक फोरमन हे नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमधील न्यूट्रल बॉयन्सी लॅबमध्ये उपस्थित राहणार आहे. टेक्सासमधील ह्य़ूस्टन येथे हे केंद्र आहे.
पहिले स्पेस वॉक वीस मिनिटांचे
अमेरिकेचा अवकाशवीर एडवर्ड हिगिन्स व्हाईट उर्फ एड व्हाईट याने पहिला स्पेस वॉक केला. नासाच्या जून १९६५ मधील जेमिनी प्रकल्पात जेम्स मॅकडिव्हिट, एड व्हाईट हे अवकाशवीर होते त्यांनी चार दिवसांत पृथ्वीला ६६ प्रदक्षिणा घातल्या होत्या. एड व्हाईट याने वीस मिनिटे स्पेसवॉक केले. त्यावेळी अशी अफवा होती की, एड व्हाईटला स्पेसवॉक करताना इतका आनंद झाला की, तो परत अवकाशयानात परत यायलाच तयार नव्हता मग त्याला परत येण्याचा आदेश देण्यात आला. ज्यावेळी स्पेस वॉक करण्यात आले ती अमेरिकेची दहावी समानव अवकाशमोहीम होती.
स्पेस वॉक म्हणजे काय.
 स्पेसवॉकमध्ये अवकाशवीर अवकाशयानाच्या जवळच्या भागात जातात. त्यांच्याकडे संरक्षक सूट असतो त्यामुळे अवकाशात त्यांना धोका नसतो. एक्स्ट्राव्हेइक्युलर मोबिलिटी सूट ते परिधान करतात. तो पांढरा असतो व त्यावर ऑक्सिजन व इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा असतो. अवकाशवीर शंभर टक्के शुद्ध ऑक्सिजन घेत असतात व त्यांच्यावर एक तृतीयंश वातावरणीय दाब असतो. ते पाणीसुद्धा पिऊ शकतात. पाच ते आठ तास स्पेस वॉक चालतो. यान दुरुस्तीची उपकरणेही त्यांच्याकडे असतात ती गुरुत्वाकर्षणाअभावी अवकाशात भिरकावली जाणार नाहीत याची काळजी घेतलेली असते पण तरीही अनेक वस्तू अवकाशवीरांच्या हातून निसटून गेल्या आहेत.