नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीने मंगळावर पाणी असल्याचा नवा पुरावा मिळवला आहे. सौरमालेत मंगळ हा पृथ्वीसारखाच ग्रह असून सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वास तेथे वाव आहे असे भारतीय वैज्ञानिकासह इतर वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.
मंगळाची छायाचित्रे व माहिती नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीने मिळवली असून त्यात एकेकाळी वाहक असलेल्या नद्या व सरोवर यांच्या खुणा गेल विवरात दिसत आहेत. मोठा खडक आदळल्याने हे विवर तयार झाले आहे.
नासाने म्हटले आहे की, क्युरिऑसिटीने गेल विवरात शोध घेतला असता मंगळावरील वातावरण एकेकाळी पाण्यास अनुकूल होते व तेथे सरोवरे होती, नद्या होत्या.
मंगळाचा माउंट शार्प पर्वत हा लाखो वर्षांत मातीचे थर एकत्र होऊन तयार झालेला आहे. आमच्या गृहितकानुसार जर माउंट शार्प बाबतचे आमचे म्हणणे खरे असेल तर मंगळावर जमिनीखाली उबदार व ओलसर वातावरण होते, असे भारतीय वशांचे अश्विन वासवदा यांनी सांगितले. ते नासाच्या पॅसाडेना येथील जेट प्रॉपलशन प्रयोगशाळेत उप प्रकल्प वैज्ञानिक आहेत. खडकाची जाडी लक्षात घेता गेल विवराचा तळ हा १५४ कि.मी. आहे व तेथे पाणी होते पण ते वाळले. नंतर ते पुन्हा पुन्हा पुनरुज्जीवित झाले. मंगळाच्या दाट वातावरणाचे स्पष्टीकरण करता आलेले नाही कारण तेथे तापमानातील चढउतार कसे होत असत हे स्पष्ट नाही.
माउंट शार्प हा तीन मैल ( ५ कि.मी.) उंच असून त्यावर खडकाचे थर दिसून आले आहेत. सरोवर, नदी व वारा यामुळे ते तयार झालेले असून मंगळावरील सरोवरात पाण्याचे बाष्पीभवन झाले. हा थराथरांचा पर्वत विवरात का आहे हे संशोधकांसाठी आव्हान आहे.
माउंट शार्पचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न चालू आहे, असे क्युरिऑसिटी प्रकल्पाचे प्रमुख जॉन ग्रोटझिंगर यांनी पॅसाडेनातील कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सांगितले. आता जिथे पर्वत आहे तिथे एकेकाळी सरोवरे किंवा तळी असावीत असे त्यांनी सांगितले.