‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) पृथ्वीच्या निरीक्षणासाठी एक उपग्रह अवकाशात पाठवला. पूर व दुष्काळ यांचा अभ्यास करण्यास त्यामुळे मदत होणार आहे. या उपग्रहाचा अपेक्षित कार्यकाल तीन वर्षे असून त्याच्या मदतीने जमिनीतील पाणी शोधता येईल. सखल भागात राहणाऱ्या लोकांना पुराची मोठी भीती असते, तर शेतकऱ्यांना दुष्काळाने नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे यावर तोडगा काढण्यात या उपग्रहाने दिलेल्या माहितीचा उपयोग होणार आहे.
‘डेल्टा दोन’ या अग्निबाणाच्या मदतीने सोडलेल्या उपग्रहाचे नाव सॉइल मॉइस्चर अ‍ॅक्टिव्ह पॅसिव्ह म्हणजे स्मॅप असे आहे.
अग्निबाण अवकाशात झेपावत असताना नारिंगी रंगाच्या ज्वाळा मागे दिसत होत्या. तासाभरात हा उपग्रह अग्निबाणापासून वेगळा झाला व त्याने सौरपंख उघडले व ऊर्जा निर्मितीस सुरूवात केली.नासाचे प्रक्षेपण व्यवस्थापक टिम डय़ुन यांनी सांगितले की या उड्डाणात कुठल्याही समस्या आल्या नाहीत. हा उपग्रह ६९२ किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर दोन आठवडय़ांनी त्यावरील उपकरणांची तपासणी अभियंते करतील व नंतर अनेक दिवस जगाचे नकाशे तयार करून मातीतील बाष्प शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. पुराचे अंदाज व दुष्काळाचे निरीक्षण त्यामुळे शक्य होणार आहे, असे नासाचे एक प्रशासक जिऑफ्री योडेर यांनी सांगितले. सध्या संगणक सादृष्यीकरणाने पुराची माहिती व दुष्काळाचे नकाशे तयार केले जातात; आता स्मॅप उपग्रहाने काही मापनांच्या आधारे माहिती दिली जाईल.