पृथ्वीला एलियन्सपासून असणारा धोका आता केवळ गोष्टी आणि चित्रपटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. एलियन्स खरोखरच पृथ्वीवर हल्ला करु शकतात, असा धोका असल्याचा अंदाज अमेरिकेची अंतराळ संस्था असलेल्या नासाला आला आहे. त्यामुळेच एलियन्सशी दोन हात करुन पृथ्वीला वाचवू शकणाऱ्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असून त्याासाठी अर्ज करण्याचे आवाहन नासाने केले आहे. यासाठी नासाकडून गलेलठ्ठ पगार दिला जाणार आहे.

भविष्यात एलियन्सचा हल्ला होईल, अशी शक्यता नासाला वाटते आहे. त्यामुळेच एलियन्सला रोखण्यासाठी आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी नासाला धाडसी अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. याबद्दलचे वृत्त न्यूजवीक या इंग्रजी संकेतस्थळाने दिले आहे. यासाठी नासाने १ लाख २४ हजार ४०६ डॉलर ते १ लाख ८७ हजार डॉलर इतका वार्षिक पगार देण्याची तयारी दर्शवली आहे. भारतीय चलनाचा विचार केल्यास ही रक्कम जवळपास ८० लाख ते १ कोटी २० लाख रुपये इतकी होते.  अमेरिकन सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरही या रिक्त पदाची माहिती देण्यात आली आहे. या जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन नासाकडून करण्यात आले आहे. नासाने या पदाला ‘प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसर’ असे नाव दिले आहे. या पदावरील व्यक्तींना पहिल्या तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीवर सेवेत घेतले जाईल, असे नासाने म्हटले आहे.

माणसाकडून पृथ्वी आणि चंद्र यांच्या व्यतिरिक्त अंतराळातील इतर कोणत्याही ग्रहाला नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरकडे असणार आहे. याशिवाय एलियन्स पृथ्वीच्या कक्षेत आल्यास त्यांना रोखण्याची जबाबदारीदेखील याच अधिकाऱ्यांकडे असेल. या धाडसी अधिकाऱ्यांचे काम अतिशय आव्हानात्मक असेल. अंतराळातील नासाच्या उपग्रहांचे संरक्षण करणे, अंतराळात जैविक कचरा पसरू देऊ नये ही जबाबदारी प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरला पार पाडावी लागणार आहे.

एलियन्सपासून पृथ्वीला असणाऱ्या धोक्याचा अंदाज घेऊन याबद्दलची अचूक माहिती नासाला देत राहण्याचे काम प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरकडे असेल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने इंजिनीयरिंगमध्ये उच्चस्तरीय प्रशिक्षण घेतलेले असावे आणि त्या व्यक्तीला कामाचा अनुभव असावा, असे नासाने म्हटले आहे. अर्जदार व्यक्तीकडे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता, दडपणाच्या स्थितीत काम करण्याचा अनुभव असावा, अशी अपेक्षा नासाकडून व्यक्त करण्यात आली आहे.