नासाच्या हबल दुर्बीणीला गुरूचा सर्वात मोठा चंद्र असलेल्या गिनीमीडवर बर्फाच्या शिखराखाली खाऱ्या पाण्याचा महासागर सापडला आहे. या संशोधनामुळे तेथील स्थिती सजीवसृष्टीस अनुकूल असावी, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढे पाणी आहे त्यापेक्षा जास्त पाणी या गिनीमीड नावाच्या चंद्रावर (नैसर्गिक उपग्रहावर) आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे. पृथ्वीसारखे वसाहत योग्य ठिकाण शोधण्यासाठी द्रव स्वरूपातील पाणी ओळखणे गरजेचे आहे. नासाच्या वॉशिंग्टन येथील विज्ञान मोहिमा संचालनालयाचे सहायक प्रशासक जॉन ग्रन्सफेल्ड यांनी सांगितले की, हा शोध म्हणजे हबल दुर्बीणीच्या दृष्टिकोनातून एक मैलाचा दगड आहे. गिनीमीडवर बर्फाच्या टोपीखाली मोठा महासागर असून त्यामुळे तेथे पृथ्वीसारख्या जीवसृष्टीस अनुकूल स्थिती असू शकते.
गिनीमीड हा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा उपग्रह असून त्याला स्वत:चे चुंबकीय क्षेत्रही आहे. त्यामुळे ध्रुवीय प्रारणे निर्माण होतात. तापलेल्या विद्युतभारित वायूच्या स्वरूपात ती रिबीनप्रमाणे चमकताना दिसतात. गिनीमीडच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांवर हा परिणाम दिसतो. गिनीमीड हा गुरूच्या जवळ असल्याने तो गुरूच्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली येतो. जेव्हा गुरूचे चुंबकीय क्षेत्र बदलते तेव्हा गिनीमीडचे हे प्रारण क्षेत्र म्हणजे रिबिनीसारखा वायूंचा प्रवाह मागे पुढे होत असतो. अशा दोन रिबिनीसारख्या प्रारण प्रवाहांची हालचाल बघून वैज्ञानिकांनी गिनीमीडच्या कवचाखाली खाऱ्या पाण्याचा महासागर असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जर्मनीतील कोलगन विद्यापीठाचे जोआशिम सॉर यांनी हबल दुर्बीणीच्या मदतीने गिनीमीडचे अंतरंग उलगडण्याची कल्पना मांडली. जर तेथे खाऱ्या पाण्याचा समुद्र असेल तर गुरूच्या चुंबकीय क्षेत्रामुळे या सागरात दुय्यम चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन ते गुरूच्या चुंबकीय क्षेत्राशी सामना करीत असेल. त्यामुळे चुंबकीय घर्षणाने  वायूचे रिबिनीसारखे प्रकाशित पट्टे मागे पुढे होत असावेत. जर तिथे सागर नसता तर हे पट्टे ६ अंश हलले असते, ते सध्या २ अंशांनीच हलताना दिसतात. या सागराची जाडी १०० किलोमीटर असावी व तो पृथ्वीच्या महासागरापेक्षा दहा पट खोल असावा. तसेच तो बर्फाच्या टोपीखाली दडलेला असावा. गिनीमीडवर सागर असल्याची शंका १९७० मध्ये वैज्ञानिकांना आली होती. नासाच्या गॅलिलिओ मोहिमेत २००२ मध्ये गिनीमीडचे चुंबकीय क्षेत्र मोजण्यात आले होते व तो त्याबाबतचा एक पुरावा होता.
आता नवीन निरीक्षणे अतिनील किरणांच्या मदतीने केली असून त्यात पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असलेल्या हबल दुर्बीणीचा वापर केला आहे. त्या दुर्बीणीमुळे अतिनील प्रकाश रोखला जात असतो. ‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च-स्पेस फिजिक्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.