नासाच्या मार्स रोव्हर क्युरिऑसिटीने प्रथमच मंगळावर कार्बनी रेणू असल्याचा पुरावा दिला आहे. सेंद्रिय रेणू हे कुठल्याही ग्रहावरील सजीवांचा मूळ घटक असतात. मंगळावरील नमुन्यांचे परीक्षण करणाऱ्या पथकाने सांगितले, की क्युरिऑसिटी गाडीला तेथे गेल विवरात शीप बेड मडस्टोनमध्ये खणले असता तेथे कार्बनी रेणू सापडला. या कार्बनी रेणूची रचना कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या अणूंनी झालेली आहे. असे असले तरी कार्बनी रेणू हे रासायनिक अभिक्रियातून बनू शकतात, त्यात सजीवसृष्टीशी काही संबंध असत नाही. तेथे सापडलेला कार्बनी रेणू अजैविक प्रक्रियेतून तयार झालेला आहे की मंगळावरील प्राचीन अवशेषांचा भाग आहे हे समजू शकलेले नाही. त्यामुळे तो अजून अंतिम पुरावा मानता येत नाही. अजैविक स्रोतांमध्ये मंगळावरच्या प्राचीन उष्ण झऱ्यांमधील पाण्याची अभिक्रिया किंवा आंतरतारकीय धूळ व धूमकेतूमधून कार्बनी रेणू येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वैज्ञानिकांच्या मते गेल विवरातील सरोवरात अब्जावधी वर्षांपूर्वी चिखलाचे खडक होते, नंतर ते सरोवराचा एक भाग बनले. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनावरून गेल विवरात सूक्ष्मजीवांचे अस्तित्व आहे असे म्हणता येत नाहीय. पूर्वी मंगळावरील जी सूक्ष्मजीवसृष्टी होती, त्यात कार्बनी रेणू असावेत व ते त्यांच्या ऊर्जेचा स्रोत असावेत. क्युरिऑसिटीनेच याआधी असे दाखवून दिले होते, की त्याच मडस्टोन म्हणजे चिखलापासून बनलेल्या खडकात पाणी व सजीवांसाठी आवश्यक असलेले काही रासायनिक घटक सापडले होते.जे कार्बनी रेणू सापडले आहेत, त्यात क्लोरिन अणू आहेत. शिवाय क्लोरोबेन्झीन व डायक्लोरोअलकेन्ससारखे डायक्लोरोइथेन व डायक्लोरोप्रोपेन व डायक्लोरोब्युटेन यांचा समावेश आहे.
क्लोरोबेन्झिनचे प्रमाण १५० ते ३०० पार्ट पर बिलीयन असून ते पृथ्वीवरचे नैसर्गिक संयुग नाही व त्याचा वापर कीटकनाशके , चिकटद्रव्ये व पेंट यात केला जातो. डायक्लोरोप्रोपेनचा वापर औद्योगिक विद्राव्य घटक म्हणून पेंट स्ट्रिपर्स, व्हार्निश व फर्निचर पॉलिश रिमूव्हरमध्ये केला जातो. त्यामुळे क्लोरिन असलेले कार्बनी रेणू अशाच पद्धतीने मडस्टोनमध्ये आले असावे, असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला.

जर पृथ्वीवर ३.८ अब्ज वर्षांपासून सजीवसृष्टी अस्तित्वात आहे, तर आमच्या निष्कर्षांनुसार मंगळावरही त्याच काळात द्रव पाणी व उबदार हवामान तसेच कार्बनी द्रव्य होते. त्यामुळे जर पृथ्वीवर या अवस्थेमध्ये सजीवसृष्टीची निर्मिती झाली, तर मंगळावरही ती झाली असली पाहिजे.
-कॅरोलिन फ्रेसीनेट, नासाच्या मेरीलँड येथील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या वैज्ञानिक