दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्व राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. कलाम हे खरे सुपुत्र तसेच असाधारण व्यक्तिमत्त्व होते, असा गौरव सर्वानी केला. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी डॉ. कलाम यांना आदरांजली अर्पण केली. दरम्यान, कलाम यांच्या पार्थिवावर गुरुवार, ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम् या त्यांच्या जन्मगावी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. कलाम यांचे सोमवारी शिलाँग येथे निधन झाल्यानंतर गुवाहाटीहून मंगळवारी त्यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने येथे आणण्यात आले. कलाम यांना मानवंदना देण्यासाठी त्या वेळी तेथे उपस्थित असलेले राष्ट्रपती व इतरांनी मिनिटभर शांतता पाळली. तिन्ही दलांच्या सेनाधिकाऱ्यांनीही कलाम यांना लष्करी मानवंदना दिली. त्यानंतर कलाम यांचे पार्थिव १०, राजाजी मार्ग या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तेथेही राष्ट्रपती, पंतप्रधान व अन्य मान्यवरांनी कलाम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिन्ही दलांचे प्रमुख भारतीय हवाई दलाचे मार्शल ९६ वर्षीय अर्जुन सिंग, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आदींनी कलाम यांना आदरांजली अर्पण केली.
कलाम यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येतील. कलाम यांचे ज्येष्ठ बंधू मुथू मोहम्मद मीरान मरक्कईर यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती.
सरकारी ठराव
डॉ. कलाम यांच्या निधनाबद्दल सरकारने अधिकृत दुखवटा ठराव मंजूर केला. ‘मिसाइल मॅन’ या नावाने विख्यात असलेल्या कलाम यांनी ‘अग्नि’ व ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्रांच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. हलक्या वजनाच्या विमानांची निर्मिती करून संरक्षण दलांमध्ये स्वयंपूर्णता यावी, यासाठीही कलाम यांनी योगदान दिले, असे सरकारच्या ठरावामध्ये नमूद करण्यात आले आहे.
डॉ. कलाम यांनी देशासाठी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा गौरव केला. कलाम यांचे निधन झाल्यामुळे एक चांगला देशभक्त, थोर शास्त्रज्ञ आणि सामान्य माणसाचा मित्र गमावला आहे, असे मोदी म्हणाले.
संसदेतही डॉ. कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. कलाम यांनी शेवटच्या श्वासापर्यंत भारतातील तरुण वर्गाशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या मनात ऊर्जा निर्माण केली, असे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले.
डॉ. कलाम यांच्या निधनामुळे देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, या शब्दांत राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
संसदेच्या उभय सभागृहांतील सदस्यांनी डॉ. कलाम यांना शांतता पाळून आदरांजली अर्पण केली.
डॉ. कलाम हे जनतेचे राष्ट्रपती होते, या शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गौरव केला.