सीबीएसईचा प्रस्ताव; परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद

महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) वर्षांतून एकदाच घेण्याचा प्रस्ताव सीबीएसईने दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेबाबत अनिश्चितता समाप्त करत ही परीक्षा सीबीएसई घेणार असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केले आहे. याच्यापूर्वी सीबीएसईने परीक्षेचे आयोजन करण्यास असमर्थता दर्शवली होती. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक स्तरावर आहे. परीक्षा आयोजित करण्यासाठी आवश्यक असणारी साधने आणि यामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता प्रस्तावावर विचार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या ज्युनिअर रिसर्च फेलोशिप देण्याकरिता आणि विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये साहाय्यक प्राध्यापक होण्याच्या पात्रतेसाठी प्रत्येक वर्षी दोन वेळा जुलै आणि डिसेंबर महिन्यात नेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शिक्षक म्हणून भरती होण्यासाठी नेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सीबीएसई सध्या अनेक परीक्षा घेत असल्याने इतर परीक्षा घेण्यास आम्ही असमर्थ असल्याचे सीबीएसईने मानव विकास संसाधन विकास मंत्रालयाला (एचआरडी) म्हटले होते.

मंत्रालयाने याबाबत कोणतेही निर्देश दिले नसून, सीबीएसईने आतापर्यंत जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी कोणतीही अधिसूचना काढलेली नाही. ही अधिसूचना सामान्यपणे एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात जारी करण्यात येते.

केवळ ४ टक्के उमेदवार परीक्षा उत्तीर्ण

नेट परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी फक्त १७ टक्के उमेदवार परीक्षा देतात. त्यापैकी फक्त ४ टक्के उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होतात. सीबीएसई या प्रमुख मुद्दय़ावर विचार करत आहे.

जुलै महिन्यातील परीक्षा वेळेवरच!

मागील आठवडय़ात काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. परीक्षेबाबत असणारी अनिश्चितता संपवून परीक्षेबाबतची अधिसूचना जारी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर यूजीसीने याबाबत तातडीने बैठक घेऊन परीक्षा जुलैमध्येच घेण्याचे आश्वासन दिले आहे.