काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हाती पक्षाची धुरा सोपवण्यापूर्वी त्यांच्यासाठी नव्या टीमची बांधणी सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता माजी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आणले जाण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या नेत्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात येईल. त्यामुळे स्थानिक स्तरावर काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळण्याची आशा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आहे. सोनिया यांच्या प्रस्तावास राहुल गांधी यांनीदेखील अनुकूलता दर्शवली आहे.
माजी मुख्यमंत्र्यांना संघटनात्मक कामासाठी एका राज्याची जबाबदारी देण्यात येईल. विविध राज्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आणल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल. केंद्र सरकारच्या विविध योजना, केंद्र-राज्य संबंध तसेच केंद्रीय योजनांची राज्यातील अंमलबजावणीवर माजी मुख्यमंत्र्यांचे मत विचारात घेतले जाईल. राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदापूर्वी सोनिया गांधी यांनी अनुभवी नेत्यांची एक नवी फळी दिल्लीत उभी करायची आहे. त्यामुळेच माजी मुख्यमंत्र्यांना सरचिटणीसपद दिले जाईल. तसेच सर्व माजी मुख्यंत्र्यांना केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये निवडणूक प्रचारासाठी पाठवले जाणार आहे. माजी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आणूून संघटनात्मक विस्तारावर भर देण्यात येणार आहे. तत्पूर्वी राहुल गांधी सर्व माजी मुख्यमंत्र्यांशी लवकरच संवाद साधण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्याने राहुल यांच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू आहे. राहुल स्वत प्रत्येक राज्यातील सुमारे २० ते ३० नेत्यांच्या शिष्टमंडळाशी एकाच वेळी चर्चा करतात.